अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये उमेदवारांना प्रचारादरम्यान होणारा खर्च नोंदविणे बंधनकारक आहे. या खर्चासाठी लागणार्या वस्तू, खाद्यपदार्थ, जाहिराती, रॅली, वाहन, मंडप, हार, फेटे, सुरक्षा अंगरक्षक आदींसाठीचे दर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी निश्चित केले आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार हे दर जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांच्या उपस्थितीत बुधवारी (12 नोव्हेंबर) झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले.
जिल्ह्यातील कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, शिर्डी व श्रीगोंदा नगरपालिका तसेच नेवासा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सोमवार (10 नोव्हेंबर) पासून सुरूवात झाली असून, अर्ज दाखल केल्यापासून मतदान होईपर्यंतचा सर्व खर्च उमेदवाराला दैनंदिन नोंदणीसह निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे सादर करावा लागेल. उमेदवाराने राष्ट्रीयकृत किंवा सहकारी बँकेत निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र खाते उघडणे बंधनकारक आहे. अर्ज दाखल केल्यानंतर खर्च नोंदीसाठी अधिकार्यांकडून रजिस्टर दिले जाते.
या रजिस्टरमध्ये दररोज सभा, रॅली, वाहन, जाहिरात, पोस्टर, कार्यकर्त्यांसाठी चहापान व भोजनाचा खर्च नमूद करणे आवश्यक आहे. प्रचारादरम्यान सुरक्षा हवी असलेल्या उमेदवारांना दररोज एक हजार रूपये प्रति अंगरक्षक असा दर आकारला जाणार असून, तो निवडणूक खर्चामध्ये समाविष्ट केला जाणार आहे. दरम्यान उमेदवाराने ठरविलेल्या दरांपेक्षा कमी दर दाखविले तरी ते ग्राह्य धरले जाणार नाहीत. पारदर्शकता राखण्यासाठी प्रत्येक उमेदवाराने दैनंदिन खर्चाची अचूक नोंद ठेवणे आणि ती वेळेवर सादर करणे आवश्यक आहे, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
खाद्यपदार्थांचे दर रूपयामध्ये
प्रचारादरम्यान उमेदवारांनी कार्यकर्त्यांसाठी केलेला खर्च या ठरविलेल्या दरानुसारच ग्राह्य धरला जाणार आहे. तो पुढील प्रमाणे : चहा (10), कॉफी (15), पोहे (20), वडापाव (15), भजे प्लेट (20), पाण्याची बाटली (17), मिसळपाव (60), पावभाजी (60), व्हेज थाळी स्पेशल (180), नॉनव्हेज थाळी (240), बिर्याणी (150).
इतर खर्चाचे दर रूपयामध्ये
फुलांचा लहान हार (30), फुलांचा मोठा हार (80), गांधी टोपी (10), फेटा (190), ढोल-ताशा प्रति व्यक्ती (500), मंडप स्क्वेअर फूट (15), प्लॅस्टिक खुर्ची दिवसाचे भाडे (10), व्हीआयपी सोफा (1500), पिण्याच्या पाण्याचा टँकर (2200), माहितीपत्रक एफोर साईज एक हजार प्रती (4250).





