Monday, May 6, 2024
Homeनगरमुरूम माफियांच्या मुसक्या आवळा : सुनील कराळे

मुरूम माफियांच्या मुसक्या आवळा : सुनील कराळे

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Devlali Pravara

देवळाली प्रवरा व राहुरी कारखाना परिसरातून अवैधरित्या रोज हजारो ब्रास मुरूम उचलून शासनाचा कोट्यवधीचा

- Advertisement -

महसूल बुडविणार्‍या मुरूम माफीयांच्या आठ दिवसांत मुसक्या आवळा अन्यथा राहुरी तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देवळाली प्रवरा शिवसेना शहराध्यक्ष सुनील कराळे यांनी दिला आहे.

याबाबत तहसीलदार फसियोद्दीन शेख यांना देण्यात आलेल्या निवेदनात कराळे यांनी म्हटले, गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून परिसरात मुरूम माफियांनी हैदोस घातला आहे. मुरुमाने भरलेले डंपर राजरोसपणे दिवसाढवळ्या भरधाव वेगाने रस्त्यावरून ये-जा करीत आहेत. त्यामुळे परिसरातील अनेक रस्ते उखडले आहेत. तर भरधाव वेगाने जाणार्‍या डंपरमुळे नागरिकांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे.

रस्त्यावर दुचाकीने जाणे व पायी चालणे देखील अवघड झाले आहे. भरधाव वेगाने धावणार्‍या मुरुमाच्या डंपरखाली चिरडून एक निष्पाप बळी गेल्याची घटना घडल्यानंतर महसूल विभागाने काही दिवस मुरूम वाहतूक बंद केली होती. त्यानंतर सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने चिखल निर्माण झाला.

रस्त्यावर, गोठ्यात व घरासमोर मुरूम टाकण्याची मागणी वाढल्याने मरूम माफियांनी पुन्हा डोके वर काढले व कारखान्याच्या बेणे मळ्याशेजारील असलेल्या मोकळ्या जागेतून अवैधरित्या मुरूम वाहतूक सुरू झाली.

मागणी वाढती असल्याने एका डंपरचे चार ते पाच हजार रुपये प्रमाणे विक्री करण्यात येत असून रोज वीस ते पंचवीस डंपर मुरूम वाहतूक करीत आहेत. यामुळे शासनाचा रोज कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. ज्याठिकाणाहून मुरूम वाहतूक केली जाते, तेथील शेतकर्‍यांचेही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून मुरूम माफिया शेतकर्‍यांनाही दमदाटी करीत असल्याच्या तक्रारी शेतकर्‍यांनी केल्या आहेत.

मुरूम तस्करीला तहसीलदार यांनी तातडीने आळा घालून मुरूम माफियांच्या आठ दिवसांत मुसक्या न आवळल्यास कुठलीही पूर्वसूचना न देता राहुरी तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा कराळे यांनी दिला आहे.

याबाबतचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री व जिल्हाधिकारी यांनाही पाठविण्यात आले असल्याचे कराळे यांनी सांगितले.

मुरुम वाहतुकीच्या अवैध वाहतुकीतून मिळणार्‍या बेसुमार पैशातून गुन्हेगारी वाढत असून कट्टा संस्कृती जन्माला येत आहे. याचे भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या