मुंबई । Mumbai
निवडणूक आयोगाविरोधात आज शनिवार, १ नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडी (मविआ) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्या वतीने मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’ काढण्यात येत आहे. या मोर्चाला प्रतिउत्तर देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने (भाजपा) गिरगाव चौपाटी येथे ‘मूक आंदोलन’ सुरू केले आहे. यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे.
निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर आक्षेप घेत मविआ आणि मनसे हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन मोर्चा काढत आहेत. चर्चगेट येथील फॅशन स्ट्रीटपासून या मोर्चाची सुरुवात होणार असून, तो मुंबई महानगरपालिका मुख्यालयापर्यंत जाणार आहे. या मोर्चाला ‘सत्याचा मोर्चा’ असे नाव देण्यात आले आहे. यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेस नेते, डाव्या पक्षांचे नेते, तसेच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यासारखे युवा नेते उपस्थित राहणार आहेत.
विरोधकांच्या या जोरदार शक्तिप्रदर्शनाला भाजपाने ‘मूक आंदोलना’द्वारे प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे भाजपाचे हे आंदोलन सुरू आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम, मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मंत्री आशिष शेलार यांच्यासह आमदार योगेश सागर, आमदार विद्या ठाकूर आणि प्रवक्ते नवनाथ बन यांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे. या मूक आंदोलनाच्या माध्यमातून विरोधकांना जोरदार राजकीय प्रत्युत्तर देण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.
भाजपाचे नेते आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना विरोधकांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, “एकदा अशी रणनिती चालते, पण वारंवार तीच तीच ‘स्ट्रॅटेजी’ चालणार नाही.” विरोधकांनाही कल्पना आहे की, लोक त्यांच्यासोबत नाहीत. लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या बाजूने आहेत, असे लोढा यांनी स्पष्ट केले. फक्त मुंबई महापालिकाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात विरोधकांचा सुपडा साफ होणार आहे. जनतेला मोदी आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विकास हवा आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.




