Friday, May 3, 2024
Homeनगरराज्यात नगर जिल्हा गुन्हेगारीत अव्वल

राज्यात नगर जिल्हा गुन्हेगारीत अव्वल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यात विस्ताराने मोठ्या असलेल्या अहमदनगर जिल्ह्याचा गुन्हेगारीत अव्वल क्रमांक असल्याचे पुढे आले आहे.

- Advertisement -

नुकताच राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचा (सीआयडी) एक अहवाल समोर आला यामध्ये जिल्हा गुन्हेगारीत एक नंबर असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र वाढत असलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी जिल्ह्यात पोलिसांचे बळ कमी पडत आहे. वाढीव पोलीस ठाणे व पोलिसांची संख्या वाढल्यास गुन्हेगारी रोखण्यास मदत होईल असे वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले.

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने 2020 या वर्षाचे राज्यातील सर्वच जिल्ह्यांची गुन्ह्यांचे वर्गीकरण करून जिल्ह्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी सादर केली आहे. त्यामध्ये एका वर्षात 38 हजार 816 गुन्ह्यांची नोंद एकट्या नगर जिल्ह्यात झाली आहे.

त्यामुळे गुन्हे दाखल होण्यात नगर जिल्हा अव्वल असल्याचे या आकडेवारीमध्ये समोर आले आहे. त्यापाठोपाठ नाशिक, पुणे, जळगाव, कोल्हापूरचा नंबर लागतो. राज्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहमदनगर जिल्हा हा सर्वात मोठा आहे. जिल्ह्यात 45 लाखांहून अधिक लोकसंख्या असून कायदा सुव्यवस्थेसाठी जिल्ह्यात 30 पोलीस ठाणे कार्यरत आहेत.

सुमारे तीन हजार 200 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आणखी पोलीस ठाण्यांची आवश्यकता आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्हा पोलीस दलासाठी वाढीव 500 पोलीस कर्मचार्‍यांचा प्रस्ताव तयार करून नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्या मंजुरीने तो गृहविभागाकडे पाठविला आहे.

नगर जिल्ह्याला सात जिल्ह्यांची सीमा लागून आहे. यामध्ये नाशिक, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे, ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे. अनेक गुन्ह्यात शेजारच्या जिल्ह्यातील आरोपी निष्पन्न झाल्याचेही पुढे आले आहे.

त्यामुळे गुन्हेगारीत वाढ होत असल्याचाही अंदाज पोलीस वर्तुळात आहे. अनेक गुन्हेगार गुन्हा नगर जिल्ह्यात करतात आणि शेजारच्या जिल्ह्यात वास्तव्य करतात. त्यामुळे आरोपीला अटक करणसाठी मोठी कसरत करावी लागते. गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान जिल्हा पोलीस दलावर आहे.

नगर जिल्ह्यात पोलीस कर्मचार्‍यांची संख्या कमी आहे. मात्र, कायदा सुव्यवस्थेबाबत कमी कर्मचार्‍यांतही योग्य नियोजन करीत आहोत. तसेच वाढीव 500 कर्मचार्‍यांच्या प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. 10 पोलीस ठाण्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. यातील तीन पोलीस ठाणे मजुंरीसाठी अंतिम टप्प्यात आहेत.

– मनोज पाटील, पोलीस अधीक्षक

- Advertisment -

ताज्या बातम्या