राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून सुरू असलेल्या नगर-मनमाड महामार्गाच्या (Nagar Manmad Highway) कामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना राहुरी (Rahuri) येथे समोर आली आहे. राहुरी फॅक्टरी ते राहुरी दरम्यान, राहुरी एमआयडीसी (MIDC) परिसरात अवघ्या महिनाभरापूर्वी बांधण्यात आलेल्या नव्या पुलाला भगदाड (Bridge Hol) पडल्याचे उघड झाले असून, निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळेच (Substandard Construction) हा प्रकार घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून संबंधित यंत्रणांविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
नगर-मनमाड महामार्गावर दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. अशा महत्त्वाच्या मार्गावरील नव्याने बांधलेल्या पुलाची अवघ्या एका महिन्यातच दुरवस्था झाल्याने वाहनचालक, व्यापारी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पुलाच्या संरचनेत निर्माण झालेल्या भगदाडामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अवजड वाहतुकीचा भार सहन करण्यासाठी मजबूत आणि दर्जेदार बांधकाम अपेक्षित असताना संबंधित ठेकेदाराने निकृष्ट साहित्याचा वापर केल्याचा संशय आहे. पुलाच्या बांधकामात केवळ सहा एमएम गजांचा वापर करण्यात आल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून संपूर्ण बांधकामाची तांत्रिक चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी या पुलावरून प्रवास करणार्या वाहनचालकांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. भगदाडामुळे कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात असून प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पुलाची (Bridge) पाहणी करावी, आवश्यक दुरुस्ती करावी आणि दोषी आढळणार्या ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.




