अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर- मनमाड या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे होत असलेल्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशानंतर जिल्हा प्रशासनाने होमगार्ड नियुक्तीसाठी हालचाली सुरु केल्या असून अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी राज्याच्या होमगार्ड विभागाकडे मागणी केली आहे.
अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या कामाच्या राहुरी शहर आणि परिसरातील बहुतांशी ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली आहे. एकेरी वाहतूक सुरु असल्याने मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिक, प्रवासी, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनी यांची मोठ्या प्रमाणात अडचण होऊ लागली आहे. सर्वच व्यवस्थांवर या वाहतूक कोंडीचा विपरीत परिणात झाला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याचे तातडीने निर्देश दिले होते. वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करावे अशी सुचना त्यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या होत्या. यासर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनीही जिल्हा पोलिस प्रशासनास होमगार्ड पथक उपलब्ध करुन देण्याच्या सुचना दिल्या आहेत. पोलिस प्रशासनानेही होमगार्डच्या राज्याच्या महासमादेशकांना वाहतूक नियमनासाठी तीस दिवसांच्या कालावधीसाठी 20 होमगार्ड उपलब्ध करुन देण्याची विनंती केली आहे. अहिल्यानगर- मनमाड मार्गाचे काम आता वेगाने सुरु झाले असून दोनच दिवसांपूर्वी डॉ.सुजय विखे पाटील यांनी स्वत: रस्त्यावर उतरुन वाहतूक कोडींची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते.




