अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर लगेच नगर परिषदा व नगर पंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. नगर जिल्ह्यात 11 नगर परिषदा व 1 नगर पंचायतीसाठी निवडणूका होणार असून त्यासाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा आज (18) सोमवारी जाहीर होणार आहे. यामुळे नगर पालिका, नगर परिषदांसाठी इच्छुकांच्या नजरा या प्रभाग रचनेकडे राहणार आहे. दरम्यान, प्रारूप आराखडा जाहीर झाल्यानंतर लगेच हरकती व सूचना करता येणार असून त्यासाठी 31 ऑगस्ट मुदत देण्यात आली आहे.
दरम्यान, निवडणूका होणार्या नगर पालिका व नगर परिषदेत संबंधीत मुख्य कार्यकारी अधिकारी हा प्रारूप प्रभाग रचना जाहीर करणार आहेत. त्यानंतर हरकतीची मुदत संपल्यावर जिल्हाधिकारी हे स्वत: अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकारी हे दाखल हरकतींवर सुनावणी घेणार आहेत. त्यानंतर प्रभाग रचना अंतिम करण्यात येणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर या तीन ‘ब’ वर्ग नगर परिषदा तर राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, शिर्डी, श्रीगोंदा, जामखेड, शेवगाव, पाथर्डी या आठ ‘क’ वर्ग नगर परिषदा तर नेवासा नगरपंचायत या सर्वांचा प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर होणार आहे.
त्यापूर्वी नगर परिषदा व नगर पंचायतींचे लोकसंख्येच्या निकषानुसार प्रभाग संख्या व आरक्षण देखील निश्चित झाले आहे. आता प्रभाग कसा असणार हे उद्या कळणार आहे. जिल्ह्यात आठ नगर परिषदेची सदस्य संख्या तीन तर तीन नगर परिषदांची दोन ने वाढणार आहे. नगरपंचायतीची मात्र 17 च सदस्य संख्या राहणार आहे. नगर परिषदेसाठी द्विसदस्य तर नगर पंचायतीसाठी एक सदस्य पद्धत राहणार आहे. श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव या तीन ‘ब’ वर्ग नगर परिषदा असून श्रीरामपूरमध्ये 17 प्रभाग होणार असून 34 सदस्य संख्या राहणार आहे. कोपरगाव व संगमनेरमध्ये प्रभाग संख्या 15 झाली असून सदस्य संख्या 30 राहणार आहे. ‘क’ वर्ग नगर परिषदांमध्ये राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, शिर्डी, श्रीगोंदा, जामखेड, शेवगाव, पाथर्डी या आठ नगर परिषदांचा समावेश आहे.
राहुरी, जामखेड, शेवगाव या तीन नगर परिषदांसाठी 12 प्रभाग होणार असून सदस्य संख्या 24 राहणार आहे. तर पाथर्डी व राहाता या नगर परिषदांमध्ये 10 प्रभाग राहणार असून सदस्य संख्या 20 होणार आहे. देवळाली प्रवरा नगरपरिषदेत 10 प्रभाग व 21 सदस्य संख्या, श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये 11 प्रभाग तर सदस्य संख्या 22 राहणार आहे. तर नव्याने स्थापन झालेल्या शिर्डी नगर परिषदेमध्ये 11 प्रभाग राहणार असून संख्या संख्या 23 होणार आहे. नेवासा नगर पंचायत ही एकमेव नगर पंचायत आहे. त्या ठिकाणी सदस्य संख्या ही 17 राहणार असल्याचे प्रभाग देखीन 17 होणार आहेत.
झेडपी, पंचायत समितीची अंतिम प्रभाग रचना 22 तारखेला
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रारुप रचना जाहीर करण्यात आलेली आहे. या प्रारूप प्रभाग रचनेवर 92 हरकती दाखल झाल्या होत्या. यातील 23 हरकती मान्य करण्यात आल्या असून उर्वरित हरकती फेटाळण्यात आल्या होत्या. विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांच्या स्तरावर दाखल हरकतींवर सुनावणी झाली होती. आता 22 तारखेला विभागीय आयुक्त पातळीवरून ग्रामविकास विभागाला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अंतिम प्रभाग रचनेबाबत अहवाल देण्यात येणार असून त्यानंतर 22 तारखेला जिल्हा परिषद व पंचायत समितीची अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. आधी अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्याची तारिख ही 18 ऑगस्ट होती.
प्रभाग आणि सदस्य संख्या
श्रीरामपूर- प्रभाग 17 तर सदस्य 34. कोपरगाव- प्रभाग 15 आणि सदस्य 30. संगमनेर प्रभाग 15, तर 30 सदस्य. राहाता प्रभाग 10 तर 20 सदस्य. पाथर्डी 10 प्रभाग, तर 20 सदस्य. देवळाली प्रवरा 10 प्रभाग, तर 21 सदस्य. शिर्डी प्रभाग 11 आणि 23 सदस्य. राहुरी 12 प्रभाग आणि 24 सदस्य. जामखेड 12 प्रभाग आणि 24 सदस्य. शेवगाव 12 प्रभाग आणि 24 सदस्य. श्रीगोंदा 11 प्रभाग आणि 22 सदस्य. नेवासा 17 प्रभाग आणि 17 सदस्य असे आहेत.
प्रभाग रचनेसाठी वेळापत्रक
18 ते 31 ऑगस्ट प्रारूप रचना प्रसिद्ध करणे व त्यावर हरकती व सुचना, 1 ते 8 सप्टेंबर प्राप्त झालेल्या हरकती सूचनांवर सुनावणी, 9 ते 11 सप्टेंबर सुनावणीनंतर हरकती व सुचनांवरील शिफारशी विचारात घेऊन अंतिम प्रभाग रचना नगरविकास विभागास सादर करणे, 12 ते 18 सप्टेंबर- अंतिम केलेली प्रभाग रचना नगर विकास विभागाने राज्य निवडणूक आयोगास सादर करणे, 26 ते 30 सप्टेंबर राज्य निवडणूक आयोगाने अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करणे.





