Monday, May 6, 2024
HomeनगरNagar Urban Bank : ठेवी सुरक्षित आहेत, अफवांवर विश्वास नको

Nagar Urban Bank : ठेवी सुरक्षित आहेत, अफवांवर विश्वास नको

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर अर्बन बँकेकडे 322 कोटी 59 लाखांच्या ठेवी असून त्या सुरक्षित आहेत. त्यामुळे ठेवीदारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन नगर अर्बन बँकेच्या प्रशासनाने केले आहे. याबाबत काही शंका असल्यास बँकेच्या शाखा कार्यालयाच्या ठिकाणी तसेच प्रधान कार्यालयात ठेवीदारांचे व ग्राहकांच्या शंकांचे निरसन केले जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

नगर अर्बन बँकेचा बँकींग परवाना रिझर्व्ह बँकेने बुधवारी रात्री रद्द केला आहे. त्यामुळे बँकेचे व्यवहार गुरूवारपासून बंद झाले आहेत. आता बँकेवर रिझर्व्ह बँकेकडून अवसायक नेमला जाणार असून, त्याच्याव्दारे बँकेची थकबाकी वसुली करून ठेवीदारांचे पैसे देण्याबाबतची कार्यवाही होणार आहे. मात्र, बँकेचे बँकींग व्यवहार करण्याचे अधिकार रिझर्व्ह बँकेने काढून घेतल्याने ठेवीदारांमध्ये अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर, बँकेच्या प्रशासनाने भूमिका मांडून ठेवीदारांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

बँकेच्या प्रशासनाने याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगर अर्बन को. ऑप.बँक लि., अहमदनगर (मल्टी-स्टेट, शेडयुल्ड बँक) संदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकेचा बँकींग परवाना दिनांक 4 ऑक्टोबर 2023 रोजी कामकाजाच्या वेळेनंतर रद्द केला आहे. बँकेवर विश्वास ठेवून बँकेमध्ये ठेवीदारांनी ठेवलेला पैसा केंद्रीय निबंधक (नवी दिल्ली) यांच्यामार्फत पुढील आदेश आल्यानंतर परत देण्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.

बँकेचे एक लाखापेक्षा जास्त सभासद असून बँकेच्या 36 शाखा आहेत तसेच बँकेच्या 322 कोटी 59 लाखांच्या ठेवी आहेत. ज्या ठेवीदारांच्या ठेवी बँकेकडे ठेवल्या आहेत, त्यांच्या ठेवी सुरक्षित असून केंद्रीय निबंधक कार्यालयाकडून होणार्‍या पुढील आदेशानुसार कामकाज होईल. ठेवीदारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. याबाबत काही शंका असल्यास बँकेच्या शाखा कार्यालयाच्या ठिकाणी तसेच प्रधान कार्यालयात ठेवीदारांचे व ग्राहकांच्या शंकांचे निरसन केले जाईल, असे बँकेच्या प्रशासनामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

अपिल करू – कटारिया

नगर अर्बन बँकेचा बँकींग परवाना रद्दचा निर्णय हा आम्हाला धक्का आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाचा फेरविचार व्हावा म्हणून अपिल करणार आहोत, असे बँकेचे अध्यक्ष अशोक कटारिया यांनी सांगितले. आम्हाला 6 डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती. 20 महिन्यांत आम्ही 70 कोटींची वसुली केली. गुंतवणूक केली, इन्कमटॅक्सही भरला. रिझर्व्ह बँकेची बंधने असल्याने ठेवीदारांचे पैसे मात्र देऊ शकत नव्हतो, पण ठेवीदारांचे पैसे आजही सुरक्षित आहेत, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या