अहमदनगर । प्रतिनिधी
नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणात संशयितांच्या तपासणीसाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल, शुक्रवारी दुपारी माजी खासदार स्व. दिलीप गांधी यांच्या घरी झाडाझडती घेतली.
माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय आहे. त्यांच्या शोधासाठी ही झडती घेण्यात आली. मात्र, ते घरात आढळून आले नसल्याचे उपअधीक्षक अमोल भारती यांनी सांगितले.
आर्थिक गुन्हे शाखेमार्फत अर्बन बँक कर्ज घोटाळ्याचा तपास सुरू आहे. सुमारे 291 कोटींचा गैरव्यवहार उघडकीस आलेला असून फॉरेन्सिक ऑडिटमध्ये संशयितांच्या नावाने झालेल्या व्यवहाराची माहिती समोर आलेली आहे. या पार्श्वभूमीवर संशयितांची चौकशी व त्यांच्यावर कारवाई सुरू आहे.
हे हि वाचा : कर्ज घेता का कर्ज! जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून आवाहन
शुक्रवारी गांधी यांच्या घरी काही सदस्य आल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी पथकासह जाऊन घरात झडती घेतली. मात्र, ते आढळून आले नाहीत. दरम्यान, पथकाने घरात संपूर्ण तपासणी केली असून यात संशयित आढळून आले नसल्याचे उपअधीक्षक भारती यांनी सांगितले.
दरम्यान, नगर अर्बन बँकेशी संबंधीत गुन्ह्यांच्या तपासावर कोणीतरी प्रभाव टाकत आहे, असे गंभीर निरीक्षण छत्रपती संभाजीनगर खंडपिठाने नोंदविले आहे. यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संशयितांच्या अटकेसाठी हालचाली सुरू केल्याचे दिसून येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून यासंदर्भातील तपास थंडावला होता. पुन्हा तपासाला वेग आला असून संशयितांना अटक करून न्याय मिळण्याची अपेक्षा ठेवेदारांकडून व्यक्त केली जात आहे.
हे हि वाचा : स्थानिक गुन्हे शाखेत कोणालाच नियुक्ती मिळेना!