Thursday, May 2, 2024
Homeनगरनगरपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसकडून स्वबळाची तयारी

नगरपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसकडून स्वबळाची तयारी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आगामी निवडणुकीसाठी प्रदेश अध्यक्षांनी स्वबळाची तयारी करण्यास सांगितले आहे. अध्यक्षांनी दिलेले आदेश हे पक्षाचे धोरण असते. यामुळे जिल्ह्यातील चार नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी स्वबळाची तयारी करण्यात येत आहे. दुसरीकडे राज्यातील महाविकास आघाडीने दोन वर्षे पूर्ण केलेले असून हे सरकार पडणार असे भाजप पहिल्या दिवसापासून बोलत आहे. मात्र, राज्यातील जनमत हे आघाडी सरकारच्या बाजूनेच असल्याचा विश्वास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

शनिवारी पक्ष कार्यालयात शिर्डी, अकोला, पारनेर आणि कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर महसूल मंत्री थोरात हे माध्यमांशी बोलत होते. जिल्ह्यात 4 नगरपंचायतींच्या निवडणूका होणार आहेत. सध्या तरी या निवडणूका स्वबळावर लढण्याच्या प्रदेश अध्यक्षांच्या सूचना आहेत. त्यादृष्टीने चाचपणी सुरू आहे. एसटी कर्मचार्‍यांच्या संपावर बोलतांना मंत्री थोरात म्हणाले, कर्मचार्‍यांना न्याय देण्याचे काम राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. यामुळ एसटी कर्मचार्‍यांनी संप मागे घ्यावा.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झालेली असून विरोधी भाजपकडून सरकार कोसळणार असल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र, भाजपचा हा अंदाज या सरकारच्या निर्मितीपासून फोल ठरला आहे. आजही राज्यात जनमत चाचणी घ्या, जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूनेच दिसेल. महाविकास आघाडीची राज्यातील सत्ता ही जनतेची इच्छा असल्याचे मंत्री थोरात यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी आ. डॉ.सुधीर तांबे, आ.लहू कानडे उपस्थित होते.

स्वतंत्रपणे माहिती घेतली

तत्पूर्वी महसूल मंत्री थोरात यांनी शिर्डी, अकोले, पारनेर आणि कर्जतच्या शिष्टमंडळाकडून स्थानिक परिस्थिती समजावून घेतली. प्रत्येक ठिकाणी प्रभाग किती, त्याठिकाणी आरक्षणानूसार उमेदवार आहे का? स्वबळाचा निर्णय अंतिम झाल्यास पूर्ण पॅनल तयार करण्यासाठी आतापासून प्रभागनिहाय उमेदवारांच्या याद्या तयार ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

नवले, साळुंके यांचा सत्कार

जिल्हा बँकेवर स्विकृत संचालक म्हणून निवड झालेले मधुकर नवले आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सांळुके यांचा सत्कार मंत्री थोरात यांनी केला. बँकेच्या कर्जत मतदारसंघातून साळुंके यांचा पराभव अनपेक्षीत होता. त्यांच्यावर झालेल्या अन्याय दूर करण्यासाठी राष्ट्रवादीकडून स्वीकृत संचालक पद काँग्रेसकडे घेण्यात आल्याचे थोरात यांनी सांगितले. बँकेची निवडणूक अवघड वाटत असतांना सर्वांचा मेळ घालत सोपी केली , अशी आठवणही त्यांनी करून दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या