नंदुरबार | प्रतिनिधी | Nandurbar
जिल्हयातील नंदुरबार, शहादा, नवापूर व तळोदा या चारही नगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. यातील नंदुरबार पालिकेवर (Nandurbar Nagarpalika) शिवसेना, नवापूर व तळोदा पालिकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) तर शहादा पालिकेवर जनता विकास आघाडीचा झेंडा फडकला आहे.
नंदुरबार येथील पालिकेची ४१ जागांसाठी निवडणूक (Election) घेण्यात आली होती. याठिकाणी शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ.रत्ना चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपाचे अविनाश महादू माळी यांचा ११ हजार ११० मतांनी पराभव केला. याठिकाणी शिवसेनेचे २९, भाजपाचे ८ तर एमआयएमचे ४ नगरसेवक निवडून आले आहेत. शहादा येथील पालिकेची २९ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. यात जनता विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अभिजीत मोतीलाल पाटील हे १ हजार ४१ मतांनी विजयी झाले. येथे भाजपाचे २० तर जनता विकास आघाडीचे ९ नगरसेवक विजयी झाले आहेत.
नवापूर (Navapur) येथील पालिकेची १३ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे जयवंत जाधव हे ३ हजार ६२५ मतांनी विजयी झाले. येेथे राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे २०, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे २ तर भाजपाचा १ नगरसेवक विजयी झाला आहे. तळोदा येथील पालिकेची २१ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. याठिकाणी राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) भाग्यश्री योगेश चौधरी या ४ हजार ४७३ मतांनी विजयी झाल्या. २१ पैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ११, शिवसेनेचे ६ तर भाजपाचे ४ नगरसेवक विजयी झाले आहेत.




