नागपूर । Nagpur
औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादाला नागपुरात हिंसक वळण लागले. महाल परिसरात रात्री उशिरा दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला. काही वेळातच दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ झाली. पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर करावा लागला.
हिंदू संघटनांकडून छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी काही दिवसांपासून सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने सोमवारी आंदोलन पुकारले होते. सकाळी शिवाजी पुतळ्याजवळ आंदोलन केल्यानंतर, मुस्लिम धर्मीयांसाठी पवित्र समजल्या जाणाऱ्या काही ओळी जाळण्यात आल्याची चर्चा पसरली.
दुपारी याच्या निषेधार्थ मुस्लिम समुदायाकडूनही आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून दोन्ही गटांना रोखले. मात्र संध्याकाळी दोन्ही गट पुन्हा आमनेसामने आले आणि घोषणाबाजी, दगडफेक झाली. यामुळे परिसरात तणाव वाढला.
घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. पोलिस प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. नागपूर हे शांतताप्रिय शहर असल्याचे त्यांनी पुनः एकदा अधोरेखित केले.