नागपुर | Nagpur
औरंगजेबाच्या कबरीविरोधात सोमवारी दोन गटात हिंसक हाणामारी झाली आहे. सायंकाळी नागपुरातील महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीवरून हे दोन्ही गट समोरासमोर आले. काही वेळातच दोन्ही गटांमध्ये दगडफेक सुरू झाली. या घटनेमुळे सध्या नागपुरात तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे. या दगडफेकीमुळे नागपुरातील शिवाजी चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आहे. जमावाने काही गाड्या जाळल्या आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर केला जात आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून कसोशीने प्रयत्न केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान मोठ्या संख्येने एक गट शिवाजी चौकाच्या जवळ पोहोचला होता. या गटाने घोषणाबाजीला सुरुवात केली. घोषणाबाजी सुरू होताच परिसरातील दुसर्या गटानेही घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घोषणाबाजी करणार्या दोन्ही गटांना वेगवेगळे केले. त्यानंतर पोलिसांनी सर्वांना शिवाजी चौकावरून चिटणीस पार्कच्या दिशेने मागे ढकलले. मात्र चिटणीस पार्कच्या पलीकडे भालदारपुरा परिसरातून मोठ्या प्रमाणावर पोलिसांवर दगडफेक सुरु झाली.
पोलिसांनी बळाचा वापर करून स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठ्या आकाराचे दगड पोलिसांच्या दिशेने भिरकावले जात असल्यामुळे पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्या वापरून जमावाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. दगडफेकीमध्ये काही गाड्यांचे नुकसानही झाल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शांततेचे आवाहन
या घटनेनंतर मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरकरांना शांतता राखण्याचं आवाहन केले आहे. नागपुरातील महाल परिसरात दगडफेक आणि तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यावर पोलीस प्रशासन परिस्थिती हाताळत आहेत. या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.