Thursday, May 2, 2024
Homeअग्रलेखलोकप्रतिनिधींना नाना पाटेकरांचा समयोचित सल्ला!

लोकप्रतिनिधींना नाना पाटेकरांचा समयोचित सल्ला!

लोकशाही राज्यपद्धतीत लोकप्रतिनिधी हा जनता आणि प्रशासनातील दुवा मानला जातो. जुन्या शब्दात तो ‘प्रजा आणि राजा’ यातील सक्रीय दुवा म्हणता येईल. लोकशाहीत निवडणूक प्रक्रियेतून लोकप्रतिनिधी निवडले जातात. निवडलेल्या प्रतिनिधीत्वाच्या आयुष्याचा कालावधी कायद्याने ठरवलेला असतो. त्याकाळात लोकप्रतिनिधीने सतत आपल्या मतदारसंघातील जनतेशी संपर्क ठेवला पाहिजे ही अपेक्षा असते. दुदैर्वाने निवडून आलेले बहुतेक प्रतिनिधी ही जबाबदारी आणि कर्तव्य विसरु लागले आहेत याची समयोचित जाणीव नुकतीच नाना पाटेकर यांनी पुणे येथील शिवजयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात उपस्थितांना सडेतोड शब्दात करुन दिली आहे. नाना आपल्या भाषणात म्हणतात, ‘लोक निवडून देतात त्यामुळे जनतेची कामे करणे ही लोकप्रतिनिधींचे कर्तव्यच आहे. निवडणूक लढवा आणि निवडून या हा काही जनतेचा आग्रह नसतो. सातबार्‍यावर जमिनी नाही तर माणसे वाढली पाहिजेत. लोकांनीही त्यांच्या प्रतिनिधींना प्रश्न विचारले पाहिजेत. निवडून येण्याआधी तुमचे वजन कमी होते; निवडून आल्यानंतर कसे वाढले’ असेही लोकांनी विचारायला हवे अशा शब्दात त्यांनी लोक आणि त्यांच्या प्रतिनिधींना त्यांच्या जबाबदार्‍यांची किंबहुना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करुन दिली आहे. लोकप्रतिनिधी त्यांची जबाबदारी विसरत आहेत असे आजकाल लोकांना वाटू लागले आहे. नानांनाही कदाचित तसे वाटत असावे म्हणुनच तसे सुचवण्याची संधी त्यांनी योग्य स्थळी, योग्य वेळी साधली आहे. नाना पाटेकर जितके उत्तम अभिनेते आहेत त्याहून कांकणभर सरसच ते संवेदनशील व्यक्ती आहेत. ‘नाम फांऊडेशन’ च्या माध्यमातून ते व मकंदर अनासपुरे हे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबियांसाठी आणि वंचितांसाठी काम करतात. स्पष्टवक्ते अभिनेते म्हणून ते जनमाणसात परिचित आहेत. कोणताही आडपडदा न ठेवता ते त्यांची मते बेधडक मांडतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा मुहूर्त साधून नानांनी त्यांचे खडेबोल सर्वांनाच सुनावले आहेत. छत्रपती हे रयतेचे सेवक म्हणून ओळखले जात हेच त्यांना सुचवायचे असावे. सध्याच्या आर्थिक अस्थिरतेच्या काळात सामान्य माणसे त्रस्त आहेत. दोन वेळच्या जेवणाचीही कित्येकांना भ्रांत आहे. दैनंदिन जीवनसंघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे. अशावेळी लोकांना कदाचित मतदार म्हणून त्यांच्या कर्तव्याचा विसर पडू शकणे स्वाभाविक आहे. पण म्हणून लोकप्रतिनिधींनाही त्यांच्या कर्तव्याचा सोयीस्कर विसर पडावा का? ‘जनतेच्या दैवतांची स्मारके उभारता तसेच जनतेच्या सोयीसाठी कामे करावीत’ याचीही आठवण नानांनी करुन दिली. तथापि छत्रपतींसह कारणानिमित्ताने सगळ्या राष्ट्रपुरुषांचे गुणगान करणे आणि राजकीय वाटचाल मात्र सोयीच्या मार्गानेच सुरु ठेवणे हेच लोकप्रतिनिधींचे वैशिष्ट्य का बनले असावे? राष्ट्रपुरुषांची तत्वे आणि गुणवैशिष्ट्ये थोड्या प्रमाणात तरी अंगिकारली पाहिजेत. जनतेच्या तशी ती अनुभवास आली पाहिजेत असे मत जाणते मांडतात. तथापि परस्परांच्या उखाळ्यापाखाळ्या काढण्याच्या आणि शेलक्या शब्दात उद्धार करण्याच्या नादात लोकप्रतिनिधींना ते प्रथम लोकसेवक असल्याचा विसर पडल्याचे सध्या सर्वत्र चित्र आढळते. लोकप्रतिनिधींच्या वेतन व विविध प्रकारच्या भत्त्यांमध्ये आणि सोयीसुविधांमध्ये घसघशीत वाढीचा प्रस्ताव एकमताने संमत करुन घेणे आणि सरकारी तिजोरीला भगदाडे पाडून स्वार्थाच्या तुंबड्या भरुन घेणे एवढाच लोकशाहीचा अर्थ आणि लोकप्रतिनिधीचे कर्तव्य उरले आहे का? नानांना या उणीवा तीव्रतेने जाणवत असल्यामुळे त्यांनी संधी मिळताच त्याची समर्पक शब्दात आठवण करुन दिली आहे. त्यातील मतितार्थ पुढच्या शिवजयंतीपर्यंत तरी संबधितांच्या लक्षात येईल अशी अपेक्षा करावी का?

- Advertisment -

ताज्या बातम्या