नंदुरबार | प्रतिनिधी | Nandurbar
नंदुरबार (Nandurbar) येथे दि.१६ सप्टेंबर रोजी युवकाच्या (Youth) झालेल्या हत्येप्रकरणी आज (बुधवारी) नंदुरबार शहरात अभूतपूर्व निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. या प्रकरणाची एसआयटीमार्फत (SIT) चौकशी करण्यासह आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, मयत युवकाच्या घराजवळ सामुहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. मात्र, काही आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली. त्यामुळे या मोर्चाला हिंसक वळण लागले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातच (Collector Office) अचानक दगडफेक सुरु झाली. तसेच वाहनांची तोडफोड (Vandalized) करण्यात आली. या घटनेत पोलीस कर्मचार्यांसह काही जण जखमी झाले आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांनी अश्रृधुराचा वापर केला. या घटनेमुळे काही काळ नंदूरबार जिल्हाधिकारी परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
दरम्यान, या दगडफेकीत अनेक वाहनांच्या काचा फुटल्या. तसेच चार चाकी, शालेय बस, मोटरसायकली अशा जवळपास १५ वाहनांची (Vehicles) तोडफोड झाली आहे आहे. या दगडफेकीत पोलीस कर्मचार्यासह काही जण जखमी झाल्याचे समजते. जमाव मोठा असल्याने त्यांना पांगवण्यासाठी पोलीसांनी (Police) अश्रुधुराच्या नळकांडया फोडल्या. त्यानंतर काही वेळाने जमावावर नियंत्रण मिळविण्यात पोलीसांना यश आले. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु आहे.
नेमकं प्रकरण काय?
दि.१६ सप्टेंबर रोजी सायंकाळी शहरातील सिंधी कॉलनीतील एका कपड्याच्या दुकानात सूर्यकांत मराठे व जयेश यांच्यात थट्टामस्करी सुरु असतांना वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने त्यांच्यात झटापटी होऊन सूर्यकांतने धारदार चाकुने जयेश भिल याच्यावर वार केले. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला हॉस्पीटलमध्ये हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्हयात गेल्या आठवडयात ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला. आज दि.२४ सप्टेंबर रोजी विविध आदिवासी संघटनांनी सोशल मीडियावर निषेध मोर्चा काढण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला अभुतपूर्व प्रतिसाद देत नंदुरबार शहरातील नेहरु चौकात सकाळी १० वाजेपासून आदिवासी बांधव मोठया संख्येने जमा झाले होते.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसह गुजरात, मध्यप्रदेशातील आदिवासी बांधवदेखील या मोर्चात सहभागी होण्यासाठी दाखल झाले. नेहरु चौक, गांधी चौक, हाट दरवाजा, बालाजी वाडा, सोनार खुंट, जळका बाजार, बाबा गणपती, साक्री नाका या मार्गाने नवापूर चौफुली, जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा नेण्यात आला. यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर केले. निवेदनात जयेश भिल हत्याप्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, आरोपीची नार्कोटेस्ट करण्यात यावी, फास्टट्रॅक कोर्टात सुनावणी होवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, हत्येतील व त्यामागील आरोपींना शिक्षा झाली पाहिजे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.




