मुंबई | Mumbai
भाजप नेते आणि मत्स्य तसेच बंदरेमंत्री नितेश राणे यांच्या अलीकडील वादग्रस्त वक्तव्याने महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. धाराशिव येथील एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना नितेश राणे यांनी केलेल्या विधानावरून शिंदे गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या वक्तव्याचे पडसाद मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नितेश राणेंना खडसावल्याची माहिती आहे. त्याचबरोबर नितेश यांचे वडील आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनीही त्यांना समज दिली आहे.
नारायण राणे यांनी आज धाराशिव येथील तुळजाभवानी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. “मुख्यमंत्री हा कोणाचा बाप नसतो, तो जनतेचा सेवक असतो. मी नितेशला याबाबत समज दिली आहे. मी स्वतः मुख्यमंत्री असताना सांगायचो की मला ‘साहेब’ म्हणू नका, ‘सेवक’ म्हणा,” असं नारायण राणे यांनी सांगितलं. तसेच, कोणाचाही निधी अडवणं चुकीचं आहे, याबाबतही आपण सूचना देणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.
नितेश राणेंचं नेमकं वक्तव्य काय?
नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी धाराशिव दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांना संबोधित करताना वादग्रस्त विधान केलं. “भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हे नेहमी लक्षात ठेवावं की देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री हे भाजपाचे आहेत. कोणी कितीही नाचलं किंवा ताकद दाखवली, तरी शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भाजपाचाच मुख्यमंत्री आहे,” असं त्यांनी म्हटलं होतं. या विधानावरून शिंदे गटाने तीव्र आक्षेप घेतला असून, महायुतीतील अंतर्गत नाराजी उघड झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणी नितेश राणेंना सुनावलं आहे. पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, “कोणाचाही बाप काढणं चुकीचं आहे. मी नितेश राणेंशी याबाबत बोललो आहे. त्यांनी सांगितलं की त्यांच्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता. पण मी त्यांना स्पष्ट केलं की, तुमच्या मनात काहीही अर्थ नसला, तरी लोकांपर्यंत जो संदेश जातो, तो राजकारणात महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे अशा प्रकारे बोलणं योग्य नाही.” नितेश राणे यांनीही आपली चूक मान्य केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
नितेश राणे यांचे बंधू आणि शिवसेना आमदार निलेश राणे यांनीही या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. “नितेशने जपून बोलावं. सभेत बोलणं सोपं आहे, पण आपल्या बोलण्यामुळे कोणाचा फायदा होतो, याचं भान ठेवलं पाहिजे. आपण महायुतीत एकत्र आहोत, हे विसरता कामा नये,” असं ट्वीट निलेश राणे यांनी केलं होतं. त्यांनीही नितेश यांना समज देण्याचं आश्वासन दिलं आहे.
दरम्यान, नारायण राणे यांनी मनसे नेते प्रकाश महाजन यांच्यावरही जोरदार टीका केली. “प्रकाश महाजन हा मेंटल माणूस आहे. त्याच्याशी माझी तुलना का करता? मी दिल्लीत होतो आणि तो इथे क्रांती चौकात उभा राहतो. मी त्याला भेटायला यायचं का?” असं राणे म्हणाले. तसेच, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचं सांगत, “ते एकत्र आले तर चांगली गोष्ट आहे,” असंही ते म्हणाले.
नितेश राणेंच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. शिंदे गटाने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, मंत्रिमंडळ बैठकीतही याचे पडसाद उमटल्याचं सांगण्यात येत आहे. नितेश राणे यांच्या विधानाने महायुतीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. यामुळे भाजपा आणि शिंदे गटातील समन्वयावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
नितेश राणे यांच्या वक्तव्यावरून त्यांचे वडील, भाऊ आणि मुख्यमंत्र्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात नितेश राणे एकटे पडल्याची चर्चा आहे. यापूर्वीही नितेश राणे यांच्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाले आहेत. आता त्यांच्या या विधानामुळे महायुतीच्या अंतर्गत राजकारणात काय परिणाम होतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.




