नाशिक | Nashik
जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) येथील लेट बी. पी. ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या (Student) सहलीच्या बसचा कराडजवळ भीषण अपघात झाला आहे. सदर बस २० फूट खाली कोसळल्याने काही विद्यार्थी जखमी झाले आहेत.
याबबत अधिक माहिती अशी की, आज (मंगळवारी) सकाळी ६.४५ च्या सुमारास कराड तालुका पोलीस ठाणे (Karad Taluka Police Station) हद्दीतील वाठार गावच्या हद्दीतील पुलावरून बस क्रमांक (एम एच ०४ जी पी ०९२०)खाली कोसळली. याठिकाणी पुलाचे काम चालू असून, हा भीषण अपघात घडला आहे. या बसमध्ये ४० ते ४५ विद्यार्थी आणि शिक्षक यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.
या अपघातात (Accident) ऋषिकेश पाचोरकर, प्रज्वल माहेर, सार्थक चव्हाण आणि पीयूष काळे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Aayush Prasad) यांनी साताऱ्याच्या जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. तसेच विद्यार्थ्यांवर आवश्यक ते उपचार होणेबाबत चर्चा केली आहेत.
दरम्यान, कराडचे तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहेत. तसेच विद्यार्थ्यांवर कृष्णा रुग्णालयात (Hospital) योग्य ते उपचार सुरू आहेत. या अपघाताचे नेमके कारण मात्र कळू शकलेले नाही.




