इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri
मुंबई-नाशिक महामार्गावरील (Mumbai Nashik Highway) जुन्या कसारा घाटात (Old Kasara Ghat) कंटेनरचा अपघात झाल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. त्यामुळे अपघातामुळे नाशिक मुंबई महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली होती. अपघातस्थळी महामार्ग सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक राम व्होंडे व पोलीस पथकाने धाव घेऊन ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.
याबाबत अधिक माहिती अशी की गुरुवार (दि.२६) रोजी मुंबईहून नाशिककडे येणारा कंटेनर (Container) हा सकाळी कसारा घाटामध्ये आला असता अचानक बंद पडला. बंद पडून उभ्या असलेल्या कंटेनरवर पाठीमागून येणारा कंटेनर आदळल्यामुळे कंटेनर रोडवर आडवा झाल्याने संपूर्ण कसारा घाट ठप्प झाला होता.या अपघातामुळे मुंबईहून नाशिककडे (Mumbai to Nashik) येणारी वाहतूक ही बंद झाली होती.
दरम्यान, इगतपुरी हायवे प्रायव्हेट लिमिटेड, महामार्ग सुरक्षा पोलीस व इतर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक कोंडी रोखण्यासाठी जुन्या कसारा घाटातील वाहतूक (Traffic) नवीन कसारा घाटातून वळविण्यात आली. यानंतर क्रेनच्या मदतीने आडवा झालेल्या कंटेनरला रस्त्यातून बाजूला घेऊन वाहतुक सुरळीत करण्यात आली. मात्र या झालेल्या अपघातामुळे वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागला.




