
नाशिक | Nashik
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) चांदवडजवळ शुक्रवारी मध्यरात्री एका भरधाव ट्रकने समोरून आणि पुढे चालणाऱ्या तब्बल ६ ते ७ वाहनांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू (Death) झाला असून १० जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, काही कार व इतर वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
नियंत्रण सुटल्याने वाहने एकमेकांवर धडकली
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास चांदवड परिसरातून (Chandwad Area) जाणाऱ्या एका ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. अनियंत्रित ट्रकने एकापाठोपाठ एक अशा अनेक वाहनांना उडवले. धडकेच्या मोठ्या आवाजाने परिसरात घबराट पसरली होती. यानंतर अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, चांदवड पोलीस, टोल नाक्याचे कर्मचारी आणि आपत्कालीन बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
महामार्गावर वाहतूक ठप्प
दरम्यान, गाड्यांमध्ये (Car) अडकलेल्या जखमी प्रवाशांना स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे तातडीने मालेगाव आणि चांदवड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. तर या अपघातामुळे मुंबई-आग्रा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला करून पहाटेपर्यंत वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.




