नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मुंबई-आग्रा महामार्गावरील ( Mumbai-Agra Highway) द्वारका चौफुलीजवळील अय्यप्पा मंदिरासमोरील उड्डाणपुलावर रविवारी (दि १२) झालेल्या भीषण अपघातात (Accident) आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. गुरुवारी (दि. १६) अरमान खान (रा. राणेनगर, सिडको) याच्यावर उपचार सुरु असताना मृत्यू झाला होता. त्यानंतर, नववा गंभीर जखमी राहुल साबळे (वय-१७) याचा शुक्रवारी (दि. १७) उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. अपघातातील इतर गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत.
रविवारी धार्मिक कार्यक्रम आटोपून घरी परतताना सह्याद्रीनगर परिसरातील तरुणांच्या (Youth) टेम्पोचा भीषण अपघात झाला होता. अपघातातील गंभीर जखमी राहुल साबळे (रा. सह्याद्रीनगर सिडको) याच्यावर जिल्हा रुग्णालयात (District Hospital) उपचार सुरू होते. त्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मागे आई, वडील, बहीण असा परिवार आहे. राहुल ग्रामोदय विद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होता.
दरम्यान, एकुलता मुलगा गमावल्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे वडील मिस्त्रीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आई गृहिणी असून पश्चात लहान बहीण आहे. कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असून अपघातात मुलगा गमविल्याने कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. राहुल कुटुंबाचा आधारस्तंभ होता. त्याच्या मृत्यूनंतर शाळा व मित्रांनीही दुःख व्यक्त केले. तो हुशार आणि हरहुन्नरी विद्यार्थी होता. त्याला जीवनात मोठे यश मिळवायचे होते, असे शिक्षकांनी (Teachers) सांगितले