नवी दिल्ली | New Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीने महाराष्ट्रातील एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला आहे. 374 किलोमीटर लांबीच्या, सहा पदरी नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडॉरच्या बांधकामाला अधिकृत मंजुरी मिळाली आहे. 19,142 कोटी रुपयांचा हा प्रकल्प महाराष्ट्राच्या दळणवळण क्षेत्रात क्रांती घडवून आणणारा ठरेल. हा महामार्ग अहिल्यानगर जिल्ह्यातूनही जाणार असल्याने या जिल्ह्याला लाभ होणार आहे.
या महामार्गामुळे नाशिक ते अक्कलकोट हे प्रवासाचे अंतर तब्बल 201 किलोमीटरने कमी होणार आहे. सध्या या प्रवासासाठी लागणार्या वेळेत 17 तासांची घट होईल (सुमारे 45% वेळेची बचत). यामुळे भाविक, प्रवासी आणि मालवाहतूकदारांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाचणार आहे. कनेक्टिव्हिटीचे जाळे ‘समृद्धी’ ते ‘दिल्ली-मुंबई’ एक्सप्रेसवेपर्यंत असणार आहे.
पंतप्रधानांच्या ‘गति शक्ती’ मास्टर प्लॅन अंतर्गत हा महामार्ग अनेक प्रमुख मार्गांना जोडला जाईल. हा महामार्ग दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे आणि आग्रा-मुंबई कॉरिडॉरला जोडला जाईल. पांगरी येथे समृद्धी महामार्गाशी जोडला जाणार आहे. हा नवीन मार्ग महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित केलेल्या पुणे-नाशिक एक्सप्रेसवेला पूरक ठरेल. हा मार्ग कुर्नूल मार्गे चेन्नई बंदरापर्यंतच्या लॉजिस्टिक्स नेटवर्कला जोडला जाईल, ज्यामुळे पश्चिम ते पूर्व किनारपट्टी थेट रस्ते जोडणी मिळेल.
आर्थिक विकास आणि रोजगाराची संधी
या प्रकल्पामुळे केवळ रस्तेच सुधारणार नाहीत, तर स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळेल. सुमारे 251 लाख मानव-दिवस प्रत्यक्ष रोजगार आणि 313 लाख मानव-दिवस अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याचा अंदाज आहे. नाशिक, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांतील औद्योगिक आणि कृषी विकासाला गती मिळेल.
चेन्नई ते सुरत द्रुतगती मगामार्गीतील रखडलेल्या नाशिक ते अक्कलकोट महामार्ग हा प्रकल्प बांधा-वापरा-हस्तांतरीत करा (बीओटी) तत्वावर बांधण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) निर्णय घेण्यात आला होता. त्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. नाशिक ते अक्कलकोट असा 374 किमीचा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल झाल्यास नाशिक ते अक्कलकोट हा प्रवास नऊ तासांऐवजी चार तासांत करता येणार आहे. नाशिक-तळेगाव दिघे हा भाग पुणे-नाशिक एक्सप्रेसवेच्या विकासाच्या दृष्टीने देखील महत्वाचा आहे. एनआयसीडीसीने महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे हाती घेतल्या जाणार्या प्रस्तावित नवीन एक्सप्रेसवेचा भाग म्हणून हा प्रकल्प असेल.
थोडक्यात फायदे:
नाशिक ते अक्कलकोट प्रवास 4 तासांत होणार
अंतर कमी: 201 किमीचे अंतर वाचणार.
वेळ वाचणार: 17 तासांचा प्रवास कमी होणार.
सुरक्षा: हाय-स्पीड कॉरिडॉरमुळे अपघात आणि वाहतूक कोंडी कमी होईल.
लॉजिस्टिक्स: मालवाहतूक जलद झाल्यामुळे व्यापार क्षेत्राला मोठा नफा होईल.
नाशिक ते अहिल्यानगर आणि अहिल्यानगर ते अक्कलकोट अशा दोन टप्प्यात होणार
नाशिक ते अक्कलकोट महामार्ग नाशिक ते अहिल्यानगर आणि अहिल्यानगर ते अक्कलकोट – अशा दोन टप्प्यात बांधला जाणार आहे. नाशिक ते अहिल्यानगर टप्पा 152 किमीचा तर अहिल्यानगर ते अक्कलकोट टप्पा 222 किमी असेल. 374 किमीचा हा महामार्ग कार्यान्वित झाल्यास नाशिक ते अक्कलकोट अंतर केवळ चार तासांत पार करता येणार आहे. आजच्याघडीला हे अंतर पार करण्यासाठी नऊ तास लागतात. सुरत ते चेन्नई द्रुतगती महामार्ग कार्यान्वित झाल्यास नाशिक ते सुरत अंतर दोन तासात पार करता येणार आहे. चेन्नई ते सुरत महामार्ग नवसारी येथे दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे पुढे दिल्लीकडे जाणेही सोपे होणार आहे.




