नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik
वर्षाच्या शेवटच्या दिवशी नवीन नाशकात राजकीय हायहोल्टेज ड्रामा बघायला मिळाला. महापालिका निवडणुकीसाठी (NMC Election) उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशी प्रभाग २९, २५ आणि २६ मध्ये भाजपने तीन उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने गोंधळ उडाला होता. यात दोन माजी नगरसेवकांचा समावेश आहे. प्रभाग २९ मधील ‘अ’ गटासाठी दीपक बडगुजर व मुकेश शहाणे यांनी एबी फॉर्म सादर केले होते. यामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बडगुजर यांचा एबी फॉर्म वैध ठरवत शहाणे यांचा एबी फॉर्म अवैध ठरवल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.
तसेच प्रभाग २५ (क) मध्ये भाग्यश्री ढोमसे आणि हर्षा बडगुजर यांना तर प्रभाग २६ (क) मध्ये पुष्पावती पवार आणि अलका अहिरे यांना भाजपने एबी फॉर्म दिले. त्यात माजी नगरसेविका ढोमसे आणि पुष्पावती पवार यांचे अवैध ठरले. बुधवारी (दि. ३१) सकाळी उमेदवारी अर्ज छाननी सुरू करण्यात आली. यावेळी प्रभाग २९ च्या उमेदवारांची छाननी सुरू असताना दीपक बडगुजर व मुकेश शहाणे या दोघांनी भाजपचा एबी फॉर्म जोडल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. यावेळी उमेदवारी अर्जाचीदेखील तपासणी करण्यात आली. दीपक बडगुजर यांनी आधी उमेदवारी अर्ज भरल्याचे दिसून आल्याने मुकेश शहाणे (Mukesh Shane) यांचा एबी फॉर्म बाद करण्यात आला. यावर शहाणे यांनी हरकत घेतल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तीन वाजेनंतर सर्वच हरकतींवर निकाल देण्याचे जाहीर केले. तेव्हापासून बडगुजर आणि शहाणे समर्थकांची गर्दी जमा होऊ लागली.
दोन्ही बाजूच्या वकिलांचे म्हणणे ऐकल्यानंतर याचा निकाल बराच वेळ राखून ठेवण्यात आला. यावेळी बडगुजर आणि शहाणे समर्थकांमध्ये हाणामारी होऊ नये याकरिता पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता. तब्बल दोन तास याठिकाणचा निकाल राखून ठेवण्यात आला होता. याप्रकरणाचा निकाल देण्याकरिता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फक्त बडगुजर आणि शहाणेंना कक्षात बोलावले. यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी दोघांच्या हातात निर्णयाची प्रत दिली. त्यामध्ये मुकेश शहाणे यांचा एबी फॉर्म अवैध ठरवण्यात आला. यावेळी पोलीस बंदोबस्तात शहाणे यांना बाहेर नेण्यात आले तर बडगुजर यांना त्याच ठिकाणी ठेवण्यात आले. यावेळी शहाणे माध्यमांशी बोलण्यात व्यस्त असतांना पोलिसांनी बडगुजर यांना दुसऱ्या दरवाजातून बाहेर नेले. पोलिसांनी (Police) वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे कुठलीही अनुचित घटना घडली नाही.
पहिला एबी फॉर्म माझा होता कारण पक्षाने मला अधिकृत एबी फॉर्म दिला होता. जे झाले ते चुकीचे झाले. चोरून एबी फॉर्म भरल्याने माझा घातपात झाला. प्रभागातील मतदार जनता माझ्या पाठीशी आहे. मी सर्वसामान्य घरातील मुलगा आहे. मला कोणतेही राजकीय पाठबळ नाही. पुन्हा एकदा विधानसभेची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. मी निवडणुकीला सामोरे जाणार.
मुकेश शहाणे
पक्ष निर्णय घेईल तो निर्णय मान्य असेल.
दीपक बडगुजर




