नाशिक | प्रतिनिधी | Nashik
तक्रार अर्जावरून गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात दोन एजंटकडून नाशिकरोड पोलीस ठाण्यातील (Nashik Road Police Station) सहायक पोलीस निरीक्षकाने ५० हजार रुपयांच्या लाचेची (Bribe) मागणी केल्याबाबत तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यामुळे नाशिकरोड पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक गणेश किसन शेळके यांच्याविरोधात लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्याविरोधात एका जागा खरेदीदाराने नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. प्लॉटची खरेदी न केल्याप्रकरणी ही तक्रार होती. या तक्रार अर्जाच्या (Application) तपासासाठी शेळके यांनी तक्रारदारासह आणखी एकास चौकशीसाठी बोलवले. त्यावेळी शेळके यांनी डिसेंबर २०२३ मध्ये दोघांना तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकेन अशी धमकी देत ५० हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाने शहानिशा करीत सापळा रचला. पंचासमोर शेळके यांनी तडजोड करीत ४० हजार रुपयांची मागणी केली.
‘पैसे घेत नाही’
तक्रारदाराच्या (Complainant) फिर्यादीनुसार, १३ डिसेंबर २०२३ रोजी लाचेचे पैसे देण्यासाठी ते शेळके यांच्याकडे गेले असता पंचासमोर शेळके यांनी ‘पोलिस कोणत्याही कामाचे पैसे घेत नाही’ असे बोलून पैसे घेतले नव्हते. त्यामुळे शेळके यांना कारवाईची भनक लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, तक्रारदार जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फेब्रुवारी ते जून या कालावधीत कारागृहात होते. त्यानंतर पत्नीची प्रकृती बिघडल्याने व त्यांचा मृत्यू (Death) झाल्याने तक्रारदाराने शेळकेंविरोधात तक्रार नव्हती दिली.