नाशिक | प्रतिनिधी | Nashik
बालपणापासूनची घट्ट मैत्री, वर्षानुवर्षांचा विश्वास आणि त्यातून झालेले कोट्यवधींचे आर्थिक व्यवहार अखेर गंभीर वैरात बदलून थेट जाळपोळीपर्यंत पोहोचल्याची खळबळजनक घटना सीबीएस परिसरातील जुन्या एनडीसीसी बँकेसमोर (NDCC Bank) सोमवारी (दि. ५) रात्री घडली. आर्थिक वादातून धमक्या देत खंडणी मागितल्यानंतर चार्टर्ड अकाऊंटंटच्या घरासमोर उभ्या वाहनांना पेटवून देण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
संशयित चैतन्य गुणवंतराव पाटील (रा. इम्पिरिओ हाइट्स, महात्मानगर) या रिअल इस्टेट व्यावसायिकाला सरकारवाडा पोलिसांनी (Sarkarwada Police) अटक केली असून, त्याचा साथीदार राज पवार हा अद्याप पसार आहे. फिर्यादी रुची सुराणा व त्यांचे पती हर्षल (रा. आशिष बंगला, जुन्या एनडीसीसी बँकसमोर, सीबीएस) हे सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट) आहेत. हर्षल व संशयित चैतन्य पाटील यांची बालपणापासून मैत्री होती. सन २०१५ च्या सुमारास दोघांमध्ये सुमारे १ कोटी ८० लाख रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले होते. हे पैसे कालांतराने परत करून व्यवहार पूर्णतः निकाली काढल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
तथापि, व्यवहार संपुष्टात आलेला असतानाही चैतन्य पाटील याने राज पवारमार्फत पुन्हा १ कोटी ८० लाख रुपयांची खंडणी मागण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. १३ सप्टेंबर २०२५ पासून वारंवार फोन व तोंडी धमक्यांद्वारे सुराणा कुटुंबाचा मानसिक छळ करण्यात आला. रक्कम न दिल्यास आत्महत्या करून संपूर्ण कुटुंबाला अडकविन, घर जाळून टाकेल तसेच इमारतीचे नुकसान करण्याच्या धमक्या दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. धमक्यांमुळे सुराणा कुटुंब (Family) दहशतीखाली होते. दरम्यान, या गुन्ह्यात चैतन्यचा साथीदार राज पवार हा पसार असून त्याच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली आहेत. तपासादरम्यान आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे, कॉल डिटेल रेकॉर्डस्, धमकीचे ऑडिओ-मेसजेस, तसेच घटनास्थळावरील सीसीटीव्ही फूटेज तपासले जात आहे. सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र बैसाने तपास करीत आहेत.
रात्री आला व उडाला आगडोंब
सोमवारी (दि. ५) रात्री पावणेअकराच्या सुमारास हर्षल सुराणा घरी नसताना चैतन्य पाटील तेथे आला. त्याने सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दोन बुलेट दुचाकी व एका मोपेडला पेट्रोल टाकून आग लावली. या जाळपोळीत वाहनांचे मोठे नुकसान झाले. आगीमुळे काही काळ तणाव निर्माण झाला. माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांनी धाव घेतली. रुची सुराणा यांच्या फिर्यादीवरून खंडणी, जाळपोळ, धमकी, मालमत्तेचे नुकसान व दहशत निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाने चैतन्यला पोलीस कोठडी सुनावली आहे.
चार्टर्ड अकाऊंटंटच्या घरासमोर राडा
- बालमित्रांत कोट्यवधींच्या व्यवहारातून वैर
- व्यवहार निकाली निघाल्यानंतरही खंडणीची मागणी
- आत्महत्या व जाळपोळीच्या धमक्या




