नाशिक | प्रतिनिधी | Nashik
चोरीच्या गुन्ह्यात सुटका करुन देण्यासाठी भंगार विक्रेत्याकडे पन्नास हजार रुपयांच्या लाचेची (Bribe) मागणी करुन पाच हजार रुपयांत सेटलमेंट करत लाच घेण्याची तयारी दर्शविलेल्या शहर गुन्हे शाखा युनिट दोनच्या (Crime Branch Unit Two) सहायक उपनिरीक्षकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
राजेंद्र सोपान घुमरे (वय ५६, रा. गणेशनगर, द्वारका) असे संशयिताचे नाव आहे. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) शुक्रवारी (दि. २७) ही कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत घुमरेची एसीबी कार्यालयात चौकशी सुरू होती. अंबड एमआयडीसीतील ३७ वर्षीय भंगार व्यावसायिक तक्रारदाराने एसीबीकडे यासंदर्भात तक्रार दिली होती. त्यानुसार ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पावणे पाच ते साडेपाच या कालावधीत संशयिताने लाच घेण्याची तयारी दर्शविल्याची तक्रार एसीबीकडे प्राप्त आहे.
त्यानुसार एसीबीच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी तपास करुन गुन्हा नोंदण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक अतुल चौधरी, अंमलदार संदीप वणवे, योगेश साळवे, अविनाश पवार, संतोष गांगुर्डे यांनी चौकशी व पुराव्यांची तपासणी करुन शुक्रवारी (दि. २७) संशयित एएसआयविरुद्ध अंबड पोलिसांत (Ambad Police) गुन्हा नोंदवला. त्यानंतर संशयिताला ताब्यात घेत चौकशी केली. आली. तपास पोलिस निरीक्षक मीरा आदमाने करत आहेत.
दरम्यान, चोरीच्या नळाचे वॉल तक्रारदाराच्या भावाने भंगारात पंधरा हजार रुपयांनी खरेदी केल्याप्रकरणी चोरीच्या गुन्ह्यातून सुटका करण्यासाठी ही लाच मागण्यात आली. संशयिताने तक्रारादाराकडे पन्नास हजार रुपयांची मागणी केली. यासह सोबतच्या पोलिस सहकाऱ्यांनाही कारवाई (Action) न करण्याचे सांगत प्रकरण मिटल्याचा दावा केला. यासह तडजोडी अंती पाच हजारांची मागणी करुन ते घेण्याची तयारी दर्शविल्याचे फिर्यादीत नमूद आहे.