पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
म्हसरूळ परिसरातील (Mhasrul Area) गुलमोहर नगर व अभिषेक विहार भागात गेल्या काही दिवसांपासून टवाळखोरांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून, रात्रीच्या वेळी हा परिसर नशेबाजांचा ‘अड्डा’ बनत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या अंधारात गांजा, मद्य तसेच इतर अंमली पदार्थांचे उघडपणे सेवन केले जात असून, या प्रकारांमुळे परिसरातील शांतता भंग होत आहे.
अभिषेक विहार हा शांत रहिवासी परिसर म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून रात्री दहा वाजल्यानंतर येथील चित्र पूर्णपणे बदलते. अंधाऱ्या गल्ल्या, निर्जन कोपरे तसेच उद्यानांच्या परिसरात तरुणांची टोळकी जमू लागतात. या ठिकाणी उघडपणे गांजाचे सेवन व मद्यपान केले जात असून, मद्याच्या पाठ्र्याही सुरू असतात. नशेच्या अमलाखाली असलेले तरुण मोठ्याने आरडाओरडा करणे, शिवीगाळ करणे. तसेच, अश्लील भाषेत संभाषण करत असल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत.
महिलांची व ज्येष्ठांची सुरक्षितता धोक्यात
या टवाळखोरांच्या दहशतीमुळे परिसरातील महिलांना संध्याकाळनंतर घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. तरुणांची संख्या मोठी असल्याने तसेच त्यांच्या हातात धारदार शस्त्रे असण्याची भीती वाटत असल्याने नागरिक त्यांना हटकण्याचे धाडस करत नसल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, “आम्हाला स्वतःच्या घरातही सुरक्षित वाटत नाही. शांतता भंग होत असून सतत मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी; पोलिसांसमोर आव्हान
मेरी-म्हसरूळ परिसरात यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न तसेच टोळीयुद्धासारख्या गंभीर घटना घडल्या आहेत. अशा घटनांची सुरुवात बहुतांशी लहान वादांतून किंवा नशेबाजांच्या अड्ड्यांतूनच होते. त्यामुळे या भागाकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या
गुलमोहरनगर व अभिषेक विहार परिसरात रात्रीची पोलीस गस्त वाढवावी, संशयास्पदरित्या फिरणाऱ्या तरुणांची चौकशी करून कडक कारवाई करावी. तसेच, ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवून नशेबाजांचे अड्डे उद्ध्वस्त करावेत व सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून टवाळखोरांवर नजर ठेवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
कायद्याचा बालेकिल्ला कुठे?
नाशिक पोलिसांकडून शहरात ‘कायद्याचा बालेकिल्ला’ मोहीम राबविण्यात येत असली, तरी म्हसरूळच्या या उपनगरांमध्ये त्या मोहिमेचा अपेक्षित प्रभाव दिसत नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. पोलीस आयुक्तांनी या तक्रारींची दखल घेऊन अभिषेक विहार व गुलमोहर नगर परिसरातील हा दहशतीचा ‘अड्डा’ बंद करण्यासाठी तातडीने ठोस कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





