नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह (Nashik Road Central Jail) नवीन व काही बंदीवानांसाठी सुरक्षित नसल्याचे अनेक प्रकरणांतून उघड असतानाच, पूर्वीपासून जेलला स्वतःचीच जहागिरी समजणाऱ्या काही सराईतांसोबत (Criminal) आता बीड (Beed) येथील आठवले आणि गिते टोळीचाही समावेश झाला आहे. या टोळीतील काही संशयितांना (Suspected) बीड कारागृहातून नाशिक व हरसूल कारागृहात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे नाशिकरोड कारागृहात मुंबई बॉम्बस्फोटांसह राज्यातील कुख्यात गुन्हेगार कैद असतानाच, आता बीडमधील आठवले टोळीलाही ‘आत’ ठेवण्यात आल्याने पुन्हा येथे टोळीयुद्ध घडण्याची अधिक शक्यता व्यक्त केली जात आहे.
बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृण खूनप्रकरणी अटकेत असलेल्या संशयित वाल्मीक कराड व सुदर्शन घुले यांच्याशी बीड जिल्हा कारागृहात आठवले टोळीचे वाद झाले आहेत. महादेव गिते व अक्षय आठवले यांच्या टोळीसोबत वर्चस्ववादातून कराड व घुले यांच्या वेळीसोबत शत्रुत्व असून त्यातून ३१ मार्च रोजी गिते व आठवले टोळीकडून कारागृहात कराड टोळीवर हल्ला करण्यात आला. त्यानुसार गिते टोळीला छत्रपती संभाजीनगरातील हर्मूल येथे हलविण्यात आले. तर अक्षय आठवले, मनीष क्षीरसागर व ओंकार सवाई या तिघांना मंगळवारी (दि. १) रोजी सायंकाळी उशिरापर्यंत नाशिकरोड कारागृहात दाखल करण्यात आले. त्यामुळे नाशिकरोड कारागृह प्रशासनाला सतर्क रहावे लागणार आहे.
बीड जिल्हा कारागृह (Beed District Jail) सध्या वादात सापडले आहे. सोमवारी (दि. ३१) सकाळी कैद्यांच्या दोन गटांमध्ये मारहाण झाल्याची घटना घडली होती. यादरम्यान संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड व सुदर्शन घुले याला यामध्ये मारहाण झाल्याची चर्चा होती. त्यानंतर कारागृह प्रशासनाने सोमवारी दुपारी खुलासा करत वाघमोडे व सोनवणे या दोन कैद्यांमध्ये मारहाण झाल्याचे स्पष्ट केले. यानंतर मंगळवारी सकाळी अक्षय आठवले, मनीष क्षीरसागर व सवाई या तिघांना नाशिक येथील कारागृहामध्ये हलवण्यात आले. मारहाण घटनेमध्ये अक्षय आठवले याचा सहभाग असल्याची चर्चा होती. याचदरम्यान आता आठवलेसह त्याच्या साथीदारांना नाशिक कारागृहात हलवल्याने जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
कैद्याचा छळ
२५ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२५ या कालावधीत नाशिकरोड कारागृहात सर्कल क्रमांक चारमध्ये कैद्यांचे एकमेकांशी वाद झाले. त्यातून संशयित कैद्यांनी सागर उर्फ पंकज बाजीराव चौधरी (वय २५, रा. नेर कुसुंबा, धुळे) या पीडिताला कारागृहातील दवाखानाच्या स्वच्छतागृहाजवळ नेत हातापायांना बेड्या ठोकल्या. कारागृहात जेवण वाटणारा पॉलने अस्वच्छ हातानेच बळजबरीने सागरला भत्ता खाण्यास दिला. सागस्ने नकार देताच मारहाण केली. कारागृह अधीक्षक राउंडवर असताना सागस्ने संशयितांबाबत तक्रार केली. त्यामुळे संशयितांनी खुनशीने सागरला स्वच्छतागृहात जाण्यापासून कित्येक तास ताटकळत ठेवले. दुर्दैवाने त्याने स्वच्छतागृहाबाहेरच शौच केली. मात्र अधीक्षकांनी दखल न घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
तुरूंगातून ‘सुपारी’
सन २०२३ मध्ये सातपूरमध्ये झालेल्या गोळीबारातील तक्रारदाराचा ‘काटा’ काढण्यासाठी त्याच गुन्ह्यातील संशयिताने नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील ‘नेटवर्क’ वापरून पंजाबच्या शूटरला ‘सुपारी’ दिली होती. नाशिकरोड कारागृहातील बंदी परमिंदर उर्फ गौरव राजेंद्र सिंग आणि आशिष राजेंद्र जाधव यांनी सुपारी दिली होती. नोव्हेंबर २०२४ मध्ये पालघर पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केलेल्या शुभम सिंग (वय २९, रा. लुधियाना, पंजाब) याच्या चौकशीदरम्यान ही बाब उघड झाली होती. सिंग याने संबंधिताला ठार मारण्यासाठी नाशिक शहरात सात दिवस रेकी केली होती.