नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शरणपूर रोडवरील (Sharanpur Road) बेथेल नगरालगतच्या तिबेटियन मार्केटजवळ सराईतांनी हवेत गोळीबार (Firing) करुन तोडफोड करत दहशत पसरवली. ही घटना सोमवारी (दि. ३) रात्री साडेनऊ वाजता घडली. परिसरातील एका सराईत गुंडाच्याच साथीदारांनी हा गोळीबार केल्याचे समोर येते आहे.
तिबेटियन मार्केट परिसरात करून दहशत गोळीबार माजविण्याचा प्रयत्न झाल्यावर परिसरातील सर्व दुकाने व खाद्यपदार्थांची दुकाने (Shop) तातडीने बंद झाली. तर शरणपूर येथील बेथेलनगर, संत आंद्रिया वसाहतीमध्ये टोळक्याने हातात कोयते, पिस्तूल घेऊन शिरकाव करुन धुडगूस घातला, टोळक्याने येथे दोन रिक्षा, एक मोटरसायकलची तोडफोड करत पळ काढला.
दरम्यान, माहिती कळताच सरकारवाडा पोलिसांनी (Sarkarwada Police) धाव घेत माहिती घेतली. गोळीबार व तोडफोड करणाऱ्या संशयितांची ओळख पटण्याचे काम सुरु असून, घटनास्थळी फॉरेन्सिक पथक दाखल झाले होते.
चायनीज चालकांची मुजोरी
तिबेटियन मार्केटमधील ‘फूडकोर्ट’ च्या नावे सुरु असलेल्या अनेक चायनीज गाड्या व भुर्जी विक्री हातगाड्यांवर सराईतांचाच राबता दिसून येतो. काही चायनीज दुकानदार व्यवसायाच्या नावाखाली आपली दुकानदारी चालवित आहे, असा आरोप होत असून उघड्यावर मद्यपानास बसण्यासाठी जागा देणे, चढ्या दराने खाद्यपदार्थांची विक्री, शिळे पदार्थ व मुदतबाह्य तेल वापरुन व्यवसाय सुरु असल्यासह अन्य स्वरुपाच्या तक्रारी महानगरपालिकेसह सरकारवाडा पोलिसांना देण्यात आल्या आहेत.




