Friday, July 5, 2024
Homeक्राईमNashik News : क्राईम डायरी - तीन मारहाणीच्या घटनांसह अपघात, चोरीच्या घटना

Nashik News : क्राईम डायरी – तीन मारहाणीच्या घटनांसह अपघात, चोरीच्या घटना

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

दोघांना मारहाण

पंचवटीतील गणेशवाडी येथे अपघाताची कुरापत काढून संशयितांनी दोघांना बांबू व उसाने मारहाण करीत वाहनाचे नुकसान केले. शुभम संतोष दाते, त्याचा भाऊ व मनोज अशी संशयितांची नावे आहेत. मंगेश रामू गुप्ता (रा. लेवा पाटीदार कार्यालयाजवळ, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (दि. २५) सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून, संशयितांनी मंगेश व रामू शंकर गुप्ता (५३) यांना मारहाण केली. तर, शुभम दाते याच्या फिर्यादीनुसार, अपघाताच्याच कारणावरून संशयित मंगेश गुप्ता व त्याचे वडील रामू गुप्ता यांनी बेदम मारहाण केली. पंचवटी पोलिसात परस्परविरोधी गुन्हा दाखल आहे.

घरात घुसून मारहाण

फुलेनगरमधील वैशालीनगरात राहणाऱ्या महिलेच्या घरात घुसून संशयितांनी घरातील सामानाची तोडफोड करून लाकडी दांडक्याने मारून दुखापत केली. नितीन थेटे, नाना थेटे, सोमनाथ थेटे, पूजा शेटे, दीप थेटे, अल्का शेटे (सर्व रा. बच्छाव हॉस्पिटलसमोर, वैशालीनगर, फुलेनगर) अशी संशयितांची नावे आहेत. रेखा मनोज दोंदे (रा. बच्छाव हॉस्पिटलसमोर, वैशालीनगर, फुलेनगर) यांच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (दि. २५) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास संशयितांनी संगनमत करून दोंदे यांच्या घरात घुसले आणि घरातील खुर्च्या, होम थिएटर तोडून लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यांची मुलगी जखमी झाली. पंचवटी पोलीसात गुन्हा दाखल आहे.

आईला मारहाण

उत्तमनगर येथे मुलाने आईकडे पैसे मागितले असता, ते न दिल्याने त्याने आईला लाकडी दांड्याने मारून दुखापत केली. अविनाश दत्तात्रय घुगे (३१) असे संशयित मुलाचे नाव आहे. सुशिला दत्तात्रय घुगे (रा. श्रीकृष्ण अपार्टमेंट, उत्तमनगर) यांच्या फिर्यादीनुसार, ही घटना गुरुवारी (दि.२३) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चालक ठार

मुंबई नाका हद्दीत पौर्णिमा बसस्टॉपसमोर दुचाकी घसरून झालेल्या अपघातामध्ये ३१ वर्षीय चालक ठार झाला. विजय सुधाकर कुलकर्णी (रा. मधुकर नगर, पाथर्डी फाटा) असे मयत चालकाचे नाव असून, त्याने अंमली पदार्थाचे व्यसन केलेले होते. सहायक उपनिरीक्षक निसार शेख यांच्या फिर्यादीनुसार, १४ एप्रिल रोजी रात्री हा अपघात झाला. मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवक ठार

गंगापूर रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार झाल्याची घटना घडली. सौरभ भागवत बोराळे (२३, रा. जिजामाता कॉलनी, शिवाजीनगर, नाशिक. मूळ रा. युनूसपूर, जि. बुलढाणा) असे मयत युवकाचे नाव आहे. सौरभ हा शुक्रवारी (दि. २४) दुपारी साडेचारच्या सुमारास कॉलेजरोडकडून गंगापूर गावाकडे दुचाकीवरून जात होता. त्यावेळी हरिओम ढाब्याजळ वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात त्यास गंभीर मार लागल्याने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर शनिवारी (दि. २५) जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. गंगापूर पोलिसात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

युवकाचा मोबाईल लांबविला

त्र्यंबकरोडवरील सिबल हॉटेल जवळ फूड डिलीव्हरी करण्यासाठी आलेल्या संशयितांनी युवकाचा ७ हजारांचा मोबाईल लंपास केला. अमोल कोंडाजी बागुल (रा. त्रिमूर्ती चौक, सिडको) याच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (दि. २५) दुपारी तो सिबल हॉटेलजवळ असताना तिघा संशयितांनी त्यास बोलण्यात गुंतवून ठेवत फुड डिलिव्हरी बॅगवर ठेवलेला मोबाईल हातचलाखीने लंपास केला. सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जबरीने नवे कपडे पळविले

कॉलेजरोड परिसरातील कॅन्टाबिल शोरूम येथे अज्ञात दोघांनी सुमारे २८ हजारांची कपडे खरेदी करून बिल न देता ते बळजबरीने नेले. हर्षल प्रदीप भावसार (रा. रायगड चौक, सिडको) यांच्या पिर्यादीनुसार, शनिवारी (दि. २५) दुपारी साडेबाराच्या सुमारास दोघे शोरूममध्ये आले. त्यांनी पॅन्ट, शर्ट, टीशर्ट, परफ्यूम, डीओ, बरकुडा, अल्ट्रेशनचे शर्ट असे २७ हजार ९९० रुपयांचा कपडे बळजबरीने बिल न देता नेले. सरकारवाडा पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फोटो व्हायरल करुन धमकावले

अल्पवयीन पीडितेचे मोबाईलमध्ये फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. तसेच तिच्यासोबतचे फोटो तिच्या नातलगांच्या सोशल मीडियावर टाकून बदनामी केली. याप्रकरणी संशयित हरी उर्फ दीपक विठ्ठल कोरडकर (२०, रा. रायपूर, ता. साक्री, जि. धुळे) याच्याविरोधात पोक्सो व बलात्कारासह विविध कलमान्वये सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयिताने १८ एप्रिल रोजी त्र्यंबकमधील धनश्री हॉटेल व लॉजिंगमध्ये सदरचा प्रकार केला व पीडितेचे अश्लिल फोटो तिच्या नातलगांना व्हॉटसअप, इन्स्टाग्रामवर पाठविले. महिला उपनिरीक्षक महाजन या तपास करीत असून, गुन्हा त्र्यंबकेश्वर हद्दीत घडल्याने तो त्र्यंबक पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

मोबाईलची चोरी

सिडकोतील महादेव चौकामधील उघड्या घरातून चोरट्याने दोन मोबाईल चोरून नेले. चैतन्य रामदास देवरे (रा. महादेव चौक, सिडको) याच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (दि. २५) मध्यरात्री घराचा दरवाजा उघडा असताना, संशयिताने ॲपल व व्हिओ असे दोन फोन चोरून नेले. अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, केसरमान नरबहादूर बोहरा (रा. पार्थ पॅलेस हॉटेल, श्रमिकनगर, सातपूर) यांचा हॉटेलच्या रुम क्रमांक १०८ मधून १२ हजारांचा मोबाईल चोरट्याने चोरून नेला. सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुळेवाडीतून जनावरांची सुटका

म्हसरुळ पोलिसांनी सुळेवाडीतून सहा गायी व एक वासरू या गोवंशीय जनावरांची सुटका करीत एक पिकअप जप्त करीत संशयिताला अटक केली आहे. निसार अबूब पठाण (३६), शफिक शेख (रा. संगमनेर, जि. नगर) असे संशयिताचे नाव आहे. महिला पोलीस अंमलदार सुवर्णा प्रकाश राऊत यांच्या फिर्यादीनुसार, म्हसरुळ पोलिसांना पिकअपमधून गोवंशीय जनावरांची अनधिकृतरित्या कत्तलीसाठी वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने शनिवारी (दि. २५) दुपारी एक वाजता सुळेवाडी येथे वाहन ताब्यात घेतले. त्यावेळी वाहनात सहा गायी व एक वासरू या गोवंशी जनावरांची डांबून क्रूर पद्धतीने वाहतूक केली जात होती. म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या