नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरात ‘जीमेन्स, एमएचटी सीईटी आदी अभियांत्रिकी शाखेच्या शिक्षणक्रमाचे ऑनलाईन व्हिडिओ (Online Video) खासगी ‘लर्निंग’ कंपनीच्या अधिकृत ॲप्लिकेशन वरुन विनापरवानगी ‘डाऊनलोड’ करत ते टेलिग्रामवरुन परस्पर विक्री करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. त्यानुसार, नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात (Nashik Cyber Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित टेलिग्राम आयडीधारकाचा शोध सुरु झाला आहे.
शहरात राहणाऱ्या एका व्यावसायिकाने ‘ऑनलाईन इंजिनिअरिंग एज्युकेशन व त्यासंबंधी विद्यार्थ्यांना ‘जीमेन, ‘मेन्स’ आदी परीक्षांच्या अभ्यासाचे सशुल्क शिक्षण देण्यासाठी ‘पर्पल हॅट’ नावाने एज्युकेशन ॲप सुरु केले आहे. या माध्यमातून अभियांत्रिकी विद्यार्थ्यांकडून निर्धारित पैसे आकारुन त्यांना त्या-त्या विषयांचे शैक्षणिक व्हिडिओ (Educationl Video) पुरविले जातात. दरम्यान, हे कार्य सुरु असतानाच, ६ नोव्हेंबर २०२५ पूर्वी या संशयित टेलिग्राम आयडी धारकाने पर्पल हॅट अॅपवरील व्हिडिओ पाहिले. त्यानंतर विनापरवानगी तांत्रिक बाबींचा गैरवापर करीत अभियांत्रिकीच्या शैक्षणिक सत्रांचे बहुतांश व्हिडिओ डाऊनलोड करीत चोरी केले. यावर न थांबता वरील आयटीधारकाने ते परस्पर ‘टेलिग्राम’ आयडीवर अपलोड केले. त्यातच काही व्हिडिओ काही रक्कम स्वीकारुन संबंधितांना विक्री केले.
दरम्यान, ही बाब लक्षात येताच, कंपनी चालकाने सायबर पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदविली. तपास वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे करत आहेत. शहरात यापूर्वी सायबर चोरट्यांनी काही कंपन्यांचे अधिकृत लोगो, डाटा सायबर हल्ल्याद्वारे चोरी करुन त्याचा गैरवापर केल्याने आयटी ॲक्टसह कॉपीराईट कायद्यान्वये गुन्हे नोद आहेत. या प्रकरणांचा तपास सुरु असून वरील प्रकरणात या आयडी धारकाने प्रत्येक व्हिडिओ किती रुपयांचे विक्री केले, तो संशयित कोण?, याबाबतचा तपास सुरु झाला आहे. तर, संशयित हा डेव्हलपर असण्याची शक्यता असून या अकाऊंटवर ‘आयडी बॅन’ संबंधाने एक ऑडीओ क्लिपदेखिल अपलोड आहे, अशी माहिती पोलिसांनी (Police) दिली आहे.




