Thursday, April 30, 2026
HomeनगरAhilyanagar : साकळाई उपसा सिंचन योजनेस अखेर मंजुरी

Ahilyanagar : साकळाई उपसा सिंचन योजनेस अखेर मंजुरी

32 गावांना दिलासा || 1234 कोटींच्या योजनेतून 9,600 हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार

अहिल्यानगर |तालुका प्रतिनिधी| Ahilyanagar

श्रीगोंदा व अहिल्यानगर तालुक्यातील 32 गावांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार्‍या साकळाई उपसा सिंचन योजनेस बुधवारी (1 एप्रिल) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अखेर मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सात वर्षांपूर्वी दिलेला शब्द यानिमित्ताने पूर्ण केला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री फडणवीस यांनी 16 एप्रिल 2019 रोजी वाळकी येथे झालेल्या जाहीर सभेत साकळाई योजनेस मंजुरी देण्याचा शब्द दिला होता. त्यानंतर मंत्री विखे पाटील यांनीही या योजनेसाठी विशेष प्रयत्न केले. जलसंपदा मंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांनी या प्रकल्पाचा सातत्याने पाठपुरावा करत आवश्यक मंजुरी मिळवून दिली. या योजनेस मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम मंजुरी मिळाली असून, सुमारे 1234.13 कोटी खर्चून पुढील चार वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या योजनेअंतर्गत नगर व श्रीगोंदा तालुक्यातील सुमारे 9 हजार 600 हेक्टर क्षेत्राला पाणीपुरवठा केला जाणार आहे.

म्हैसगाव येथून चार टप्प्यांत पाणी उचलून ते श्रीगोंदा व नगर तालुक्यातील 32 गावांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. या माध्यमातून लघू पाझर तलाव, पाझर तलाव, सिमेंट नाला बंधारे तसेच गाव तलाव भरून काढण्याची योजना आहे. प्रकल्पासाठी 1.60 टीएमसी पाणी सिंचनासाठी तर 0.20 टीएमसी पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. खरीप हंगामात 15 जुलै ते 15 ऑक्टोबर या कालावधीत पाणी उपसा करून विविध जलसाठ्यांचे पुनर्भरण केले जाणार आहे. प्रस्तावित कार्यक्रमानुसार प्रकल्पाची सर्व कामे चार वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, स्व. शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार बबनराव पाचपुते आणि आमदार विक्रम पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेला मान्यता मिळाली आहे. प्रस्तावित कार्यक्रमानुसार प्रकल्पाची सर्व कामे चार वर्षाच्या कालावधीत पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. पुढील चार वर्षांत ही सगळी कामे पूर्ण होतील, असेही त्यांनी सांगितले.

दिलेला शब्द पाळला – ना. विखे
श्रीगोंदा व अहिल्यानगर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी साकळाई उपसा सिंचन योजना वरदान ठरणार असल्याचे मत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. मंत्रिमंडळ बैठकीत योजनेस मंजुरी मिळाल्याने 32 गावांतील शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, विविध परवानग्या व प्रशासकीय प्रक्रिया वेळोवेळी पूर्ण करून ही योजना मार्गी लावण्यात आली आहे. लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी पाहिलेले स्वप्न पुढील चार वर्षांत पूर्ण करण्याचा निर्धार महायुती सरकारने केला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान या योजनेबाबत राजकारण करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त भागातील जनतेला पाणी देण्याचा दिलेला शब्द पूर्ण केला असल्याचेही विखे पाटील यांनी नमूद केले.

ताज्या बातम्या

पडसाद : ट्रॅफिक पार्कचा अपमृत्यू

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक नाशिकमध्ये आणखी एका चांगल्या उपक्रमाचा अपमृत्यू होऊ घातला आहे. निओ मेट्रो व आयटी पार्क या महायुतीच्याच...