नाशिक | प्रतिनिधी | Nashik
गंभीर गुन्ह्यातील कैद्याची न्यायालयात (Court) भेट घेणे, संशयितांना शस्त्रे पुरविणे, पैसे पुरविणे, संशयितांसोबत बैठका घेणे यासंदर्भातील तपासाकरीता संशयित जगदीश पाटील (Jagdish Patil) यांना २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, कटात सहभाग घेतल्याचे उघड झाल्याने रोहन भुजबळ या सिक्युरिटी एजन्सी चालविणाऱ्या तेराव्या संशयितास (Suspected) अटक केली आहे.
पंचवटीत (Panchvati) दोन टोळ्यांच्या पूर्व वैमनस्यातून एकावर गोळी झाल्याच्या कटात सहभागी असल्याच्या संशयावरुन अटकेत (Arrested) असलेले भाजपचे माजी नगरसेवक जगदीश चिंतामण पाटील यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.
सन २०१७ मध्ये पेठरोडवर सराईत संतोष उघडे टोळीने किरण निकम या गुन्हेगारीची हत्या (Murder) केली होती. तेव्हापासून दोन्ही टोळ्यांमध्ये वैमनस्य असल्याने निकम हत्येप्रकरणी निर्दोष सुटलेला सागर जाधव याच्यावर निकम टोळीतील पंधरा जणांनी १७ सप्टेंबरच्या पहाटे गोळी झाडली. हल्ल्यात सागरच्या मानेत गोळी अडकल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, पंचवटी पोलिसांत (Panchvati Police) याबाबत दाखल गुन्ह्यात आतापर्यंत पंधरापैकी तेरा संशयितांना अटक झाली असून, त्यांच्या जबाबासह ‘कॉल डिटेल्स’ नुसार भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील हे स्वतः संशयितांनी रचलेल्या कटात सहभागी असल्याचे उघड झाले. त्यानुसार पाटील याला अटक झाली आहे. दरम्यान, किरणचा भाऊ शेखर निकम हा विविध गुन्ह्यांत सध्या कारागृहात आहे. १० सप्टेंबर रोजी एका गुन्ह्याच्या सुनावणीकरीता शेखरला जिल्हा न्यायालयात आणले होते. तेव्हा गोळीबारातील संशयित विकी वाघ व इतर साथीदार तेथे पोहोचले. त्यावेळी जगदीश पाटीलही तेथे होते.
त्यावेळी संशयितांनी सागरवर गोळी झाडण्याबाबत कट रचल्याचे समजते. त्यासंदर्भातील पुरावे, संभाषण व व्हिडिओ पोलिसांनी जप्त केले आहेत. तसेच न्यायालयात संशयितांसह शेखर निकम व जगदीश पाटील यांची भेट झाल्यावर त्यांची नाशिकरोड (Nashik Road) येथील एका हॉटेलातही बैठक घेतल्याचे समोर आले आहे. त्याबाबतचे फूटेजही हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणात लवकरच पंचवटीतील आणखी एका बड्या नेत्यावर गंडांतर येण्याची शक्यता आहे.
मुद्दे
- हत्यारे पुरविणाऱ्याचा शोध
- सागरच्या हत्येचा उद्देश काय? याचा तपास
- जगदीश पाटील यांचे आर्थिक व्यवहार पडताळणार
- कारागृहातील बंदीवानाची भेट घेतल्याचाही तपास
- चार दिवसांत सखोल तपास होण्याची शक्यता




