नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिकमध्ये मॅफेड्रेन (एमडी) विक्री करणाऱ्या वडाळागावातील ‘छोठ्या भाभी’ला बेड्या ठेकल्यानंतर आता नव्याने तीन तरुणींसह एका पुरुषाकडून सुरु असलेल्या नव्या ड्रग्ज डिलिंग टोळीला पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) अटक केली आहे. चौघांनी संगनमताने एका हॉटेलमधून एमडी तस्करी चालविल्याचे समोर आले असून, ७८ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. झालेल्या कारवाईमध्ये प्रथमच सर्वाधिक मुद्देमाल एनडीपीएसने हस्तगत केला आहे.
गणेश कैलास गिते (वय ४५, रा. मखमलाबाद), ऋतुजा भास्कर झिंगाडे (वय २२, रा. शिवाजी पार्क, सातपूर), स्विटी सचिन अहिरे (वय २८, रा. श्रीधर कॉलनी, पेठरोड), पल्लवी निकुंभ ऊर्फ सोनाली शिंदे (वय ३६, रा. साईनगर, अमृतधाम) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्या दोन साथीदारांची माहिती एनडीपीएसला मिळाली असून, त्यांचा शोध सुरू आहे.
अंमलदार चंद्रकांत बागडे यांच्या फिर्यादीनुसार शनिवारी (दि.११) मुंबई नाका पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पथकाने ७८.५ ग्रॅमचे चार लाख पंधरा हजार पाचशे रुपयांचे एमडी व उर्वरित एक लाख ९७ हजार आठशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, गुन्हे उपायुक्त प्रशांत बच्छाव व संदीप मिटके यांनी ‘एमडी’चे धागेदोरे शोधण्याबाबत एनडीपीएसला सूचना दिल्या.
पथकाच्या वरिष्ठ निरीक्षक सुशीला कोल्हे यांना मिळालेल्या माहितीनुसार पथकाला पाचारण करण्यात आले. सचिन चौधरी, विशाल पाटील, रंजन बेंडाळे, देवकिसन गायकर, संजय ताजणे, अंमलदार बाळासाहेब नाद्रे. बळवंत कोल्हे, चंद्रकांत बागडे, अर्चना भड, अविनाश फुलपगारे, योगेश सानप, भारत डंबाळे यांनी संशयितांना ताब्यात घेतले.
हॉटेलमधूनच तस्करीचा व्यवसाय
मुंबई नाका परिसरातील खासगी ट्रॅव्हल्स थांब्याजवळ आणि हॉटेल सरोजमध्ये एनडीपीएसने छापा टाकला. यावेळी गितेच्या अंगझडतीत १२ ग्रॅम व त्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून ८.५ ग्राम एमडी जप्त केले. त्याच्या चौकशीनंतर हॉटेल सरोजच्या २१२ क्रमांकाच्या खोलीत संशयित महिला झिंगाडे व अहिरे या मुक्कामी असल्याचे समजले. पथकाने तिथे धाड ठकून ५० ग्रॅम एमडी हस्तगत केले. या दोघी तस्करीसाठी कायम हॉटेलात वास्तव्य करून पुढील व्यवहार करायच्या. संशयित शिंदेच्या घरातून ८ ग्रॅम एमडी जप्त केले. या चौघांचे दोन साथीदार शकील व महेश सोनवणे ऊर्फ जॉकी हे असल्याचे समजते.
‘मॅक्स’कडून एमडीचा माग
गुन्हे शाखेकडे अमली पदार्थ शोधण्यासाठी ‘मॅक्स’ नावाचा श्वान आहे. मोठ्या प्रमाणात एमडीच्या साठ्यासह चौघांना ताब्यात घेतल्यावर ‘मॅक्स’लाही पाचारण करण्यात आले. त्याने संशयितांच्या घरात व इतरत्र धाव घेत मॅफेड्रॉनचा शोध घेतला. त्यानुसार ‘मॅक्स’ च्या मदतीने साठ ग्रॅम एमडी सापडल्याचे सूत्रांनी सांगितले.