Tuesday, June 16, 2026
Homeराजकीयममतादीदींचा पराभव करण्यासाठी मोदी-शाहांनी संपूर्ण यंत्रणा राबवली, संजय राऊतांचा घणाघात

ममतादीदींचा पराभव करण्यासाठी मोदी-शाहांनी संपूर्ण यंत्रणा राबवली, संजय राऊतांचा घणाघात

मुंबई । Mumbai

“निवडणुका जर रणांगणासारख्या लढवल्या जाणार असतील आणि त्यात लोकशाहीऐवजी केवळ दहशतीचा वापर होणार असेल, तर ही लोकशाहीची हत्या आहे,” अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर बोलताना राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली.

- Advertisement -

पश्चिम बंगालमध्ये सध्या राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. ममता बॅनर्जी यांच्यासारख्या खंबीर नेतृत्वाचा सामना करण्यासाठी भाजपने आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. यावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, “ममता दीदींना हरवण्यासाठी मोदी-शाहांनी अडीच लाख निमलष्करी दलाचे जवान तिथे तैनात केले आहेत. उद्या जर अंतराळात राजकारण सुरू झाले, तर मोदी तिथेही नेते होतील. पण आज दुर्दैवाने त्यांना राज्या-राज्यात पोलीस फौजफाटा घेऊन, लोकांना धमकावून निवडणुका जिंकाव्या लागत आहेत. याचाच अर्थ असा की, त्यांना आपला पराभव स्पष्टपणे दिसत आहे.” भाजप पराभवाच्या धास्तीनेच प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर करून पराभवाचे रूपांतर विजयात करण्याचे कारस्थान रचत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

केवळ सत्ताधारी भाजपच नव्हे, तर निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवरही राऊतांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. “देशाच्या लोकशाहीत ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. निवडणूक आयोग आता निष्पक्ष राहिलेला नाही. सत्ताधारी पक्षाला फायदा व्हावा, यासाठी आयोग दहशतीचा मार्ग अवलंबत आहे. प्रशासकीय यंत्रणा आणि आयोगाला हाताशी धरून निवडणुका जिंकणे ही लोकशाहीची थट्टा आहे,” असे राऊत यांनी ठणकावून सांगितले.

प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या पक्षाच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर बोलताना संजय राऊत यांनी संयमी पण सूचक भूमिका घेतली. “देशात सध्या तपास यंत्रणा आणि पैशाचे आमिष दाखवून पक्ष फोडले जात आहेत, हा डरपोकपणा आहे. बच्चू कडू हे शेतकरी आणि दिव्यांगांसाठी लढणारे प्रामाणिक नेते आहेत. त्यांच्यावर नक्की कशाचा दबाव आहे, हे मला ठाऊक नाही. मात्र, केवळ एका आमदारकीसाठी जर कोणी आपला पक्ष विलीन करत असेल, तर त्यातील गांभीर्य जनतेला समजतेच,” असे राऊत म्हणाले.

येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची रणनीती काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर स्पष्टीकरण देताना राऊत म्हणाले की, “इतर पक्षांनी त्यांच्या याद्या जाहीर केल्या असतील, पण महाविकास आघाडीत एकजूट आहे. आम्ही सर्व घटक पक्ष मिळून एकच उमेदवार देणार आहोत. त्या उमेदवाराचे नाव उद्या (गुरुवारी, ३० एप्रिल) सकाळी ११ वाजता अधिकृतपणे जाहीर केले जाईल.” एकूणच, पश्चिम बंगालमधील निवडणूक आणि महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर संजय राऊत यांनी केलेल्या या टीकेमुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. मोदी-शहांच्या कार्यपद्धतीवर आणि निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर राऊतांनी ओढलेले ताशेरे आगामी काळात चर्चेचा विषय ठरतील.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...