नाशिक | प्रतिनिधी | Nashik
रिक्षाचालक पतीने मध्यरात्रीच्या सुमारास पत्नीचा (Wife) ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून खून (Murder) करून स्वतःही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परिसरातील चुंचाळे परिसरात (Chunchale Area) घडली आहे. तसेच दोन जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या (Suicide) केल्याचे उघडकीस आले असून या घटनांमुळे सातपूर परिसर हादरला आहे.
याबाबत माहिती अशी की, अंबडच्या खालचे चुंचाळे येथील हनुमान मंदिर परिसरात एका चाळीतील छोट्या घरात पत्र्याच्या रूममध्ये चेतन नाना माडकर (३३) आणि स्वाती माडकर (२७) हे त्यांच्या तीन चिमुकल्या मुलांसोबत राहत होते. मोठा मुलगा दहा वर्षाचा इयत्ता पाचवीला, तर दुसरा मुलगा आठ वर्षाचा आणि सात वर्षाची मुलगी इयत्ता पहिलीत आहे. मंगळवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घटनेच्या (Incident) वेळी यातील मोठा मुलगा व लहान मुलगी घरातच होती. दोघेही मुले भाऊ बहीण झोपेत असताना वडिलांनी दारूच्या नशेत पत्नीचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर छताच्या अंगलला गळफास घेऊन स्वतःही जीवन संपवले.
रात्री तीनच्या सुमारास झोपेत असलेल्या दोन मुलांना अचानक जाग आली. त्यांनी पाहिले तर आई-वडील निश्चल अवस्थेत होते. घाबरलेल्या त्या निरागस डोळ्यांनी आईला हलवून उठवायचा प्रयत्न केला, पण प्रतिसाद मिळेना.घाबरून त्यांनी जोरजोरात रडायला आणि आरडाओरड करायला सुरुवात केली. त्यांच्या आक्रोशाने शेजारी धावून आले. घरात डोकावताच समोर हृद्य पिळवटून टाकणारे दृश्य होतं. आई मृतावस्थेत तर वडील गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आले.
दरम्यान, या दृश्याने उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू दाटले, तर निरागस मुलांचे रडणे पाहून सगळ्यांचे हृद्य द्रवले. चेतन हा रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत होता. कौटुंबिक वादामुळे काही महिन्यांपासून पत्नीपासून वेगळा राहत होता. स्वाती माडकर ही अंबडच्या (Ambad) एका खाजगी कंपनीत हेल्पर काम करून तीन मुलांचा सांभाळ करत होती. वाद मिटल्याने चेतन पत्नीच्या घरी येत-जात होता. दोन दिवसांपूर्वी पुन्हा या दोघांमध्ये वाद झाला होता. मात्र, सोमवारी रात्री वाद चिघळला आणि घर उद्ध्वस्त झाले.
दोघांची आत्महत्या
सातपूर (Satpur) एकाच दिवशी दोघांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. सचिन पंडित जाधव (वय ३५, रा. वास्तूनगर, अशोकनगर, सातपूर) याने राहत्या घरी बेडरूममध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या घटनेत सुनील गोटीराम धोत्रे (वय ३८. रा. महलवमी चौक, प्रबुद्धनगर, सातपूर) याने पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. दोन्ही घटनांचे मृत्युचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या दोन्ही प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.




