नाशिक | Nashik
बदलापूरमधील (Badlapur) स्त्री बीज विक्री प्रकरणात नाशिकच्या (Nashik) मालती आयव्हीएफ (Malti IVF Center) सेंटरवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने धाड टाकत काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली होती. यानंतर बदलापूर पोलिसांनी आयव्हीएफ सेंटरचे संचालक डॉ. अमोल पाटील याला बदलापूर पोलीसांनी अटक केली होती. त्यानंतर आता याच मालती आयव्हीएफ (IVF) सेंटरबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मालती आयव्हीएफ सेंटरमधून वर्षभरात ९६ महिलांचे बीज खरेदी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती नाशिक महापालिकेच्या (Nashik NMC) आरोग्य विभागाच्या पथकाने केलेल्या कागदपत्र तपासणीत समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास नाशिक आणि ठाणे महापालिकेचा आरोग्य विभाग तसेच बदलापूर पोलिसांचे संयुक्त पथक करत असल्याने बीज तस्करी प्रकरणातील आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, मालती आयव्हीएफ सेंटरला यापूर्वी सोनोग्राफी केंद्र, एआरटी लेव्हल टू, एआरटी बँक आणि सरोगसी क्लिनिकसाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र, या प्रकरणातील संशय वाढल्यानंतर मनपा आयुक्त मनीषा खत्री (Manisha Khatri) आणि अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या वैद्यकीय पथकाने या आधीच मालती आयव्हीएफ सेंटरची मान्यता रद्द करून केंद्र सील केले आहे.
नेमकं प्रकरण काय?
बदलापूरात स्त्री बीज वाढवणारी इंजेक्शन्स बेकायदेशीरपणे सुलक्षणा गाडेकर या महिलेने घरामध्ये साठवून ठेवली होती, असा आरोप आहे. बदलापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्सना सावंत यांच्या पथकाने सुलक्षणा गाडेकर यांच्या घरी धाड टाकून हे रॅकेट उघडकीस आणले होते.गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून हे इंजेक्शन दिले जात होते. त्यानंतर गर्भाशयात स्त्री बीजांची वाढ झाल्यावर संबंधित महिलांना आयव्हीएफ सेंटरमध्ये पाठवले जात होते. यानंतर तेथील डॉक्टरांकडून ऑपरेशन थिएटरमध्ये स्त्री बीज काढून त्यांची बेकायदेशीर विक्री केली जात होती. या प्रकरणी गाडेकर यांच्यासह अश्विनी चाबुकस्वार आणि मंजुषा वानखडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




