अंबासन | वार्ताहर | Ambasan
बागलाण तालुक्यातील (Baglan Taluka) ताहराबादजवळील क्रांतीनगर परिसरात गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत जायखेडा पोलिसांनी (Jaykheda Police) एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप गाडीमधून ११.३९ लाख रुपयांचा अवैध विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई शनिवार (दि. २७) रोजी रात्री उशिरा करण्यात आली.
सदर गाडीतील संशयास्पद साठ्याची तपासणी करताच, ‘रॉयल ब्लू व्हिस्की’च्या तब्बल १५४ बॉक्स आढळून आले. विशेष म्हणजे या गाडीचा चालक व मालक घटनास्थळी कुठेही आढळून आला नाही. याप्रकरणी पोलीसांनी (Police) अज्ञात संशियत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गुप्त माहितीवरून रंगेहात पकड
जायखेडा पोलीस ठाण्यात (Jaykheda Police Station) कार्यरत पोलिस हवालदार अरुण केंद्र बन्से, पो.हवा. शेरे आणि पो.ना. जाधव हे सायंकाळी ठाण्यात ड्युटीवर असताना, सहायक पोलीस निरीक्षक सागर काळे यांना एक गुप्त बातमी मिळाली. त्यानुसार क्रांतीनगर परिसरात एक पिकअप गाडी (MH 43 BB 1099) संशयास्पदरीत्या उभी असल्याचे निदर्शनास आले. तत्काळ पथक तयार करून पंचासह घटनास्थळी धाव घेण्यात आली.
पाठीमागील क्रेट्समधून उघडकीस आला मद्यसाठा
घटनास्थळी उभी असलेली गाडी पाहणी केली असता, गाडीच्या पाठीमागील भागात प्लास्टिकचे कॅरेट्स ठेवलेले आढळून आले. कॅरेट्स बाजूला काढल्यानंतर त्याखाली दारूचे बॉक्स लपवलेले दिसून आले. एका बॉक्सची तपासणी केली असता, त्यात ‘Royal Blue Whisky’च्या १८० मि.ली. मापाच्या बाटल्या आढळल्या. प्रत्येक बॉक्समध्ये ४८ बाटल्या अशा एकूण ७३९२ बाटल्या सापडल्या.
पावसामुळे गाडी थेट पोलीस ठाण्यात
पंचनामा सुरू असतानाच अचानक जोरदार वादळी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे पोलिसांनी सदर पिकअप गाडी तात्काळ पोलिस ठाण्यात आणून दुसऱ्या दिवशी सकाळी पंचासमक्ष तपासणी केली. त्या वेळी गाडीतून खालील प्रमाणे साठा सापडला.
गुन्हा दाखल, तपास सुरू
दरम्यान, या प्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (E) अंतर्गत अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून गाडीचा मालक व मद्यसाठा कोठून आणि कुठे नेण्यात येत होता याबाबत तपास सुरू आहे. तसेच केमिकल अॅनालिसिससाठी एक बाटली नमुन्यासाठी घेऊन त्यावर पोलीस व पंचांचे सील लावण्यात आले आहे.
स्थानिकांमध्ये खळबळ
या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गावातील काही नागरिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, सदर भागात अशा अवैध दारू वाहतुकीच्या हालचाली काही दिवसांपासून सुरू होत्या, मात्र पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून मोठी कारवाई केल्याने दारूबंदी कायद्यास बळ मिळाले आहे.
पोलिसांची अधिक चौकशी सुरू
तापास अधिकारी सपोनि सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. पिकअपचा माग काढून दोषींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असेही पोलिसांनी सांगितले.
जप्त मालमत्तेचा तपशील
वस्तूप्रमाणे किंमत
रॉयल ब्लू व्हिस्की १५४ बॉक्स (७३९२ बाटल्या) – ७,३९,२००
प्लास्टिक कॅरेट्स १२ नग ६००
पिकअप गाडी (MH 43 BB 1099) १ नग ४, ००,०००
एकूण जप्त मालमत्ता – ११ ,३९, ८००





