नाशिक | प्रतिनिधी | Nashik
तब्बल चारशे कोटी रुपयांची रोकड नेताना कथित कंटेनर लूटीप्रकरणी कर्नाटक पोलिस (Karnataka Police) शुक्रवारी (दि.२३) नाशिकमध्ये (Nashik) दाखल झाले. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून पाचवा संशयित विराट सतीश गांधी याला जयपूर येथून ताब्यात घेण्यात आले असून, शुक्रवारी (दि.२३) इगतपुरी न्यायालयात (Igatpuri Court) हजर केले असता, त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
नाशिकमधील संदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल असून नाशिक ग्रामीण पोलिसांच्या (Nashik Rural Police) मदतीने कर्नाटक पोलिस संयुक्त तपास करत आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी मुंबईतून नाशिकमार्गे दक्षिण भारतात जाणारा चारशे कोटी रुपयांच्या(कथित) रकमेने भरलेला कंटेनर लूटीचा प्रकार महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात जोरदार चर्चिला जात आहे. या घटनेचे धागेदोरे घोटीपर्यंत पोहोचल्याने, नाशिक ग्रामीण पोलिस देखील तपासात उतरले आहेत.
हे देखील वाचा : Nashik News : शौर्याचा तिरंगा नभात फडकला; ‘भारत माता की जय’ घोषणांनी सूर्यकिरण हवाई प्रात्यक्षिकांचा समारोप
फिर्यादी व ट्रक चालक संदीप पाटील याचे संशयित विराट सतीश गांधी, जयेश कोडींराम कदम, सुनील गंगाराम धुमाळ, जर्नादन भीमराव धायगुडे, विशाल सुब्रमण्यम नायडू या संशयितांनी (Suspected) अपहरण करून, त्याच्याकडून कथित ४०० कोटी रुपयांच्या लूटीची माहिती मिळविण्यासाठी पिस्तूलाचा धाक दाखवत मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच त्याला घोटी परिसरात सोडून पळ काढला होता. त्यानंतर संदीप पाटील याने नाशिक ग्रामीण पोलिसांकडे पत्रव्यवहार करीत ‘आपबिती’ सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केले होते.
दरम्यान, याप्रकरणी इगतपुरी पोलिस ठाण्यात (Igatpuri Police Station) पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी प्रारंभी चौघांना अटक केली होती. तसेच प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून जिल्हा पोलिस प्रमुखांनी विशेष तपास पथकही (एसआयटी) स्थापन केले. तर किशोर सावळा हा संशयित अद्यापही फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, संशयितांवर यापूर्वी देखील अशा स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याची माहितीही समोर येत आहे.
चोरला घाट परिसरात घडला कंटेनर लुटीचा प्रकार
बेळगाव जिल्ह्यातील चोरला घाट परिसरात कंटेनर लुटीचा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. मात्र, या प्रकरणाशी निगडीत नाशिक ग्रामीण पोलिसात संदीप पाटील याने फिर्याद दाखल केल्याने, त्याच्या तपासासाठी कर्नाटक, बेळगाव जिल्ह्यातील खानापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बिरादार आणि कमकेरी हे अधिकारी पथकासह नाशिकमध्ये दाखल झाले आहे. पथकाकडून ताब्यात असलेल्या संशयितांचा कसून तपास केला जात आहे. दरम्यान, एसआयटीचे प्रमुख ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. तर कर्नाटक पोलिस नाशिकमध्ये दाखल झाल्याने या प्रकरणाची गंभीरता वाढली आहे.
लुटच झाली नाही, बेळगाव पोलिसांचा दावा
बेळगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. व्ही. हिरेमठ यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी चोरला घाट परिसरात अशी कोणतीही चारशे कोटींच्या कंटेनर लुटीची घटना घडली नसल्याचा दावा केला आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांकडून या संदर्भात नुकतेच एक पत्र प्राप्त जाले असून, त्यास दोन ते तीन दिवसात उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे नाशिक ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी एसाआयटी स्थापन केल्याने, याप्रकरणाचा गुंता वाढण्याची शक्यता आहे.
ते ‘साहेब’ कोण?
कथित चारशे कोटी नोटा लुटप्रकरणात एका बड्या राजकीय क्षेत्रातील साहेबांचा हात असल्याची सध्या चर्चा आहे. मुंबई पोलिस मुख्यालयात सध्या या प्रकरणात चर्चा सुरू असल्याचीही माहिती सामेर येत आहे. कर्नाटक ते नाशिक, घोटीमार्गे उलगडत जाणाऱ्या या प्रकरणात आणखी वेगवेगळे वळणे येण्याची शक्यता आहे.





