मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक (Mahapalika Election) भयमुक्त व निःष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सतर्क झाली आहे. आचारसंहितेची कठोरतेने अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीकोनातून बारा पथकांची नियुक्ती करण्यात येवून शहरात (City) प्रवेश करणाऱ्या मार्गावर वाहनांची कसून तपासणी करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. आचारसंहिता पथकासह पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी ठिकठिकाणी कारवाई करत १ लाख ७७ हजार २६० रूपयांचा देशी-विदेशी मद्य साठ्यासह २ हजार रूपये किंमतीचे अंमली पदार्थ देखील जप्त केले आहेत.
दरम्यान, आचारसंहितेस प्रारंभझाल्यापासून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, निवडणूक (Election) दरम्यान अनुचित व गैरप्रकाराव्दारे आचारसंहिता भंग होवू नये यासाठी विविध पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक रणधुमाळीस चिन्ह वाटपानंतर खऱ्या अर्थाने प्रारंभ होत असल्याने गैरप्रकार होवू नये यास्तव पथक सतर्क झाले आहे. निवडणूक पारदर्शक पार पडावी यासाठी आचारसंहिता अंमलबजावणी विभाग सक्रिय झाले आहेत. आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी विविध बारा पथकांची नियुक्ती करण्यात आली असून या पथकाद्वारे शहरातील विविध ठिकाणी नाकेबंदी करण्यात येवून संशयास्पद वाहनांची तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त रविंद्र जाधव यांनी दिली.
हे देखील वाचा : Nashik Crime : नाशिकचे लाचखोर राज्यात ‘नंबर वन’; यंदाही पुणे, संभाजीनगरला टाकले मागे
शहराच्या सभोवताली असलेल्या मुख्य प्रवेश रस्त्यावर व नाक्यावर बारा स्थिर सर्व्हेक्षण पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पथकात वरिष्ठ दर्जाचे अधिकारी व सेवकांची नियुक्ती असून पोलिसांसह व्हिडीओ चित्रण करणाऱ्यांचा देखील समावेश आहे. या भरारी पथकाव्दारे अहोरात्र नियंत्रण ठेवण्यात येत असून शहरात निवडणुकीच्या निमित्ताने होणाऱ्या प्रचारसभा व विविध कार्यक्रम यांच्यावर देखरेख चित्रीकरण व नियंत्रणासाठी व्हीडीओ सव्हॅलन्स टिमची नियुक्ती करण्यात आली आहे. आठ पथकाद्वारे करण्यात आलेले चित्रीकरण तपासणी प्रक्रिया करून अहवाल देण्यासाठी चार पथकांची नियुक्ती केली आहे.
प्रलोभन-दमबाजीवर पथकांचे लक्ष
सातही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात स्थिर सर्व्हेक्षण, भरारी व व्हीडीओ सव्र्व्हेक्षण पथकासोबतच व्हीडीओ पाहणी पथक कार्यरत करण्यात आले आहेत. या पथकाव्दारे मतदारांना पैसे वाटप अथवा वस्तु स्वरूपात लाभ देणे, वस्तू, पैसे व मद्याचे वाटप करणे, प्रलोभन दाखविणे, दमदाटी करणे या आचारसंहिता भंग करणाऱ्या बाबींवर बारकाईने लक्ष ठेवण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. प्रलोभन दाखविणे किंवा वस्तुंचे वाटपाचे छायाचित्रीकरण व व्हीडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. आचारसंहितेचा भंग झाल्याचे निदर्शनास येताच संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी रविंद्र जाधव यांनी सांगितले.




