नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
येथील मालधक्का रोड परिसरात (Maldhkka Road) असलेल्या मारुती मंदिरातुन सुमारे ५० हजार रुपये किमतीचा चांदीचा मुकुट चोरून नेणाऱ्या संशयित आरोपीला नाशिकरोड पोलिसांनी (Nashik Road Police) अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून चोरलेला मुकुट देखील जप्त केला आहे.
याबाबतचे वृत्त असे की, मालधक्का रोड परिसरात मारुती मंदिर असून या मंदिराचा (Temple) दरवाजा दिवसभर सोमवारी उघडा होता. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने मंदिरात प्रवेश केला व मूर्तीच्या ठिकाणी असलेला दोनशे ८० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट चोरून नेला होता. याप्रकरणी राहुल अनिल आहिरे (रा. मातोश्री रमाबाईनगर, मालधक्का रोड, नाशिक रोड) यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) दिली होती.
या तक्रारीनंतर संशयित आरोपी शोधण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे यांच्या आदेशानुसार गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, हवालदार विशाल पाटील,महिंद्रा जाधव,सागर अडणे,अरुण गाडेकर,योगेश रानडे व इतर गस्त घालत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की,सिन्नर फाटा येथील केळकरवाडी येथे संशयित आरोपी हा आला आहे.
त्यानंतर वरील पोलीस पथकाने परिसरात सापळा रचून संशयित युवकास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचे नाव संकेत रामनाथ राऊत (वय २६,रा.देवळाली गाव राजवाडा)असे असल्याचे आढळले. त्यानंतर त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे चोरी करण्यात आलेला चांदीचा मुकुट आढळून आला. सदरचा मुकुट जप्त करण्यात आला आहे.
डिझेल चोरी करणारे गजाआड
त्याचप्रमाणे दुसऱ्या एका घटनेत परिसरातील गाड्यांचे डिझेल चोरून ते विकणाऱ्या दोघा संशयतांना नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे.त्यामध्ये एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.गुन्हे शोध पथकाचे हवालदार विजय टेमघर यांना गुप्त माहिती मिळाली की, डिझेल व अम्रोन कंपनीच्या दोन बॅटऱ्या घेऊन दोघे संशयित हे विक्री करण्यासाठी एकलहरा रोड येथे येत आहे. त्यानंतर त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना दिली.त्यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी व सहकारी एकलहरा रोड किर्लोस्कर डोंगर येथे आले असता संशयित युवक पोलिसांचे वाहन बघून पळू लागले.
त्यानंतर त्यांचा पाठलाग करण्यात येऊन पकडण्यात आले असता त्यांची नावे करण रवी सोनवणे (वय २१) रा.एकलहरे पहाडी बाबा, इंदिरानगर नाशिक तर दुसरा संशयित आरोपी हा अल्पवयीन असल्याचे समजले.या नंतर त्यांच्याकडून चार हजार पाचशे रुपयाचे ५० लिटर डिझेल ४५ हजार रुपये किमतीची हिरो होंडा व पंधरा हजार रुपये किमतीचे पोकलँड मधील अमरान कंपनीच्या दोन बॅटऱ्या असा ऐवज जप्त करण्यात आला. या कामगिरीबद्दल नाशिकरोड पोलिसांचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे,सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे,पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी,विशाल पाटील,महेंद्र जाधव,अरुण गाडेकर,सागर आडणे,योगेश रानडे,संतोष पिंगळ,विजय टेमघर,विशाल कुवर,अजय देशमुख,नाना पानसरे,समाधान वाजे,नितीन भामरे आदींचे अभिनंदन केले.





