नाशिक | प्रतिनिधी | Nashik
काही वर्षांपूर्वी झालेल्या एका खुनाच्या गुन्ह्यात (Murder Case) संशयित व मेफेड्राेन ड्रग्ज विक्रीच्या (MD Drugs) गुन्ह्यात फरार असलेल्या तेरावी शिकलेल्या २५ वर्षीय तरुणाने एमडी विक्रीतून ‘प्रस्थ’ निर्माण केल्याचे समाेर आले आहे. विशेष म्हणजे कमी वयातच त्याने गुन्हेगारीकडे ‘आकर्षित’ हाेऊन ‘एमडी’चे विक्रीकांड करुन आईच्या नावे २८ लाखांचा ‘फ्लॅट’ घेत त्यातूनच एमडी अर्थात मेफेड्राेनची विक्री केल्याचे उघड झाले आहे. गुन्हेशाखा युनिट दाेनने गुरुवारी त्याच्या फ्लॅटवर छापा टाकून एमडीच्या पुड्या ‘पॅक’ करतानाच त्याला गजाआड केले आहे.
शुभम राजेंद्र येवले (रा. लंबाेदर हाईट्स, जी. डी. सावंत काॅलेजजवळ, दामाेदरनगर, पाथर्डी फाटा) असे सराईत संशयिताचे नाव आहे. शहर गुन्हेशाखा युनिट दाेनचे हवालदार मनाेहर शिंदे यांना गुरुवारी(दि. ४) सकाळी साडेअकरा वाजता येवले हा मुंबईतून (Mumbai) एमडी ड्रग्ज आणून नाशकात विक्री करत असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यानंतर गुन्हेशाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या आदेशाने युनिट दाेनचे सहायक निरीक्षक हेमंत ताेडकर व पथकाने सापळा रचला. पथक गुरुवारी दुपारी चार वाजया पंचासह येवलेच्या ‘लंबाेदर’ हाईट्समध्ये धडकले. त्यांनी अतिशय सावधतेने येवलेच्या फ्लॅटवर दाखल हाेत त्याला ताब्यात घेतले.
त्याचवेळी त्याच्याकडे २७ हजारांचे एमडी, साेबत माेबाईल फाेन, वजनकाटा, प्लास्टिकच्या मायक्राे पिशव्या असा ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्याचवेळी त्याच्या बाजूला दीड लाख रुपयांची राेकड मिळून आली. एमडी साेबतच इतक्या माेठ्या प्रमाणात ‘हार्ड कॅश’ मिळाल्याने पथकाने त्याच्याकडे विचारणा केली. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान, याबाबत इंदिरानगर पाेलिसांत (Indiranagar Police) एनडीपीएस अॅक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास उपनिरीक्षक शिरसाठ करत आहेत.
पुन्हा ‘कल्याण कनेक्शन’
शुभम हा काही महिन्यांपूर्वी अंबडला दाखल एमडी तस्करी व विक्रीच्या गुन्ह्यात फरार हाेता. त्याच्यावर खुनाचा एक गुन्हा नाेंद असून त्याने कल्याण येथील राहुल नावाच्या संशयिताकडून हे ड्रग्ज आणल्याचे समाेर आले आहे. तीन ते चार हजार रुपये प्रतिग्रॅमने ताे हे एमडी चाेरीछुप्या पद्धतीने ओळखीतीलच नशेबाजांना विक्री करत हाेता, असे, तपासात उघड हाेत आहे. दरम्यान, त्याने कधीपासून हा नशेचा बाजार मांडला व त्यातून काय उपद्व्याप केले, याचा तपास केला जात आहे. तसेच, त्याने काही महिन्यांपूर्वीच नशेच्या बाजारातून कमविलेल्या पैशांतून आईच्या नावे लंबाेदर हाईट्समध्ये फ्लॅट खरेदी केला असून त्याचे आई-वडील सिडकाेत वास्तव्यास आहेत.
असा मिळाला मुद्देमाल
- २७ हजार ५०० रुपयांचे २४ ग्रॅम एमडी
- १२३ झिपर मायक्राे प्लास्टिक पाऊच(पुड्या)
- इलेक्ट्राॅनिक वजनकाटा
- एक वापरता माेबाईल
- १ लाख ४९ हजार ५०० रुपये राेख
- एकूण २ लाख २६ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत




