
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पुण्यासह पिंपरी चिंचवड येथे विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूनंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, नाशिक शहर आणि आमीण भागातील अवैध मद्यविक्रीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नाशिक जिल्हा (Nashik District) हा भौगोलिक दृश्या आंतरराज्यीय सीमेशी जोडलेला असल्याने, येथे अवैध दारू निर्मिती (Illegal liquor) आणि तस्करी रोखणे हे पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागासाठी नेहमीच आव्हान राहिले आहे.
पुण्याच्या घटनेनंतर नाशिकमधील (Nashik) यंत्रणा सतर्क झाली आहे? झाली असेल तर निष्पन्न काय ? जिल्ह्याच्या दुर्गम आदिवासी भागात आणि शहराच्या काही विशिष्ट स्लम परिसरात आजही गावठी (हातभट्टी) दारुचे गाळप होते. विषारी दारूच्या घटनांमध्ये प्रामुख्याने ‘मिथेनॉल’ किंवा औद्योगिक उपयोगासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘स्पिरिट’चा अनधिकृत वापर कारणीभूत ठरतो. याच केमिकलची चोरी करून किंवा रासायनिक प्रक्रिया पूर्ण न करता गावठी दारूमध्ये त्याची भेसळ केली जाते, जी थेट मानवी जीवावर बेतते.
त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा आणि कळवण या डोंगराळ व जंगलांच्या भागात नद्या (Rivers) किंवा नाल्यांच्या कडेला गावठी दारूच्या भट्टया लावल्या जातात. दुर्गम वातावरणामुळे पोलिसांना तेथे पोहोचणे कठीण होते. अनेकदा पोलिसांची गाडी येताना पाहून माफिया पसार होतात. दरम्यान, गुजरात आणि दिव दमण या केंद्रशासित प्रदेशांच्या सीमा नाशिक जिल्ह्याला लागून आहेत. तेथून येणारी स्वस्त दारू किंवा बनावट लेबल लावलेल्या बाटल्या जिल्ह्यात छुप्या मार्गाने आणल्या जातात, असे बहुतांश कारवाईतून समोर येत असते.
शहरी भागातील झोपडपट्टया आणि टपऱ्या
शहरातील पंचवटी, भद्रकाली, उपनगर, नाशिकरोड, सातपूर, अंबड, वडाळा गाव आणि नाशिक रोड परिसरात स्लम एरिया व मजुरांची संख्या अधिक आहे. याच भागात छुप्या पद्धतीने घरगुती दारूचे गुत्ते चालवले जातात, ज्याला स्थानिक भाषेत ‘कटिंगचे धंदे’ म्हणतात.
यंत्रणेसमोरील अडचणी आणि मर्यादा
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे संपूर्ण जिल्हा तपासण्यासाठी मर्यादित मनुष्यबळ आणि वाहने आहेत. एकाच वेळी अनेक ठिकाणी छापे टाकणे यंत्रणेला कठीण.
‘बॉम्बे प्रोहिबिशन अॅक्ट’ (मुंबई दारूबंदी कायदा) अंतर्गत होणारे बहुतांश गुन्हे हे जामीनपात्र आहेत. त्यामुळे पकडलेले संशयित काही दिवसांतच बाहेर येऊन पुन्हा तोच धंदा सुरू करतात. अनेकदा काही गावातील किंवा वस्तीतील नागरिक सामाजिक रोषापोटी मद्यमाफियांची माहिती पोलिसांना देण्याचे टाळतात.
| दारूचा प्रकार | मुख्य घटक | आरोग्याला होणारा धोका |
| हातभट्टी / गावठी | सडलेला गूळ, नवसागर, युरिया आणि निकृष्ट पाणी | यकृताचे गंभीर आजार, पोटात अल्सर |
| केमिकल मिश्रित | मेथेनॉल, औद्योगिक स्पिरिट | अंधत्व येणे किंवा थेट मृत्यू ओढवणे |
| बनावट विदेशी | स्वस्त दारूत रंग आणि केमिकलची भेसळ | हळूहळू किडनी निकामी होणे |




