मुंबई | Mumbai
महाराष्ट्रातील आरक्षणाचा (Reservation) राजकीय आणि सामाजिक संघर्ष पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज सकाळी १० वाजल्यापासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आपले आमरण उपोषण सुरू केले आहे. राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप नेते प्रसाद लाड यांनी काल तब्बल दीड तास जरांगे पाटील यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला; मात्र सरकारसोबतची ही चर्चा निष्फळ ठरल्याने जरांगे पाटील आपल्या आंदोलनावर ठाम राहिले. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असतानाच, दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही या आंदोलनाविरोधात आक्रमक पवित्रा घेत सरकारला थेट अल्टिमेटम दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर (Hunger Strike) प्रतिक्रिया देताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माध्यमांशी बोलताना हाके म्हणाले की, जर ओबीसी समाजाच्या हक्काचे आणि अधिकाराचे आरक्षण हिरावून घेण्याचा प्रयत्न झाला, तर संपूर्ण राज्यातील ओबीसी बांधव शांत बसणार नाहीत. “मनोज जरांगे जर बाजेवर बसून आंदोलन करत असतील, तर आम्ही थेट जमिनीवर, ढेकळात बसून आंदोलन करू,” असा इशारा त्यांनी दिला. या आंदोलनाची दिशा, ठिकाण आणि वेळ उद्या सकाळी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी (Maratha Community) स्वतंत्र ‘मराठा मंत्रालय’ किंवा ‘कुणबी मंत्रालय’ स्थापन करण्याची नवी मागणी पुढे केली आहे. या मागणीचा लक्ष्मण हाके यांनी समाचार घेतला. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून राज्याच्या राजकारणावर आणि सत्तेवर कायम एकाच विशिष्ट वर्गाचे वर्चस्व राहिले आहे, असा दावा हाकेंनी केला. मंत्रिमंडळातील मोजके ओबीसी, अनुसूचित जाती, जमाती किंवा अल्पसंख्याक मंत्री वगळले, तर बहुतांश सत्ता मुख्य प्रवाहातील नेत्यांकडेच राहिली आहे. असे असताना स्वतंत्र मंत्रालयाची मागणी करणे पूर्णपणे अतार्किक आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी आंदोलनाच्या पद्धतीवर आणि मागण्यांवर बोचरी टीका केली. अभ्यासाअभावी अशा स्वरूपाच्या मागण्या केल्या जात असून, या आंदोलनाचा मुख्य हेतू केवळ महाराष्ट्रात सामाजिक अस्वस्थता निर्माण करणे आणि राजकीय उद्दिष्टे साध्य करणे हाच असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. याशिवाय, हाके यांनी राज्यातील कंत्राटी भरती आणि खाजगीकरणाच्या मुद्द्यावरून सरकारवर तसेच भाजप नेत्यांच्या कंपन्यांवर निशाणा साधला. खाजगीकरणामुळे शासकीय नोकऱ्यांमधील आरक्षण धोक्यात आले असून, मूळ आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष भरकटवले जात असल्याची टीका त्यांनी केली. एका बाजूला जरांगे यांचे उपोषण आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी नेत्यांची आक्रमक भूमिका यामुळे आगामी काळात आरक्षणाचा हा संघर्ष काय वळण घेणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.




