नाशिक | Nashik
वडाळागावातून (Wadalagaon) ‘छोटी भाभी’ सह साथीदारांवर एनडीपीएस कायद्यान्वये कारवाई (NDPS ACT) झाली असतानाच आता पुन्हा अशोका मार्ग भागात एमडी विक्रीचा नवा अड्डा सुरु झाल्याचे समोर आले आहे. नाशिक अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) पहाटे तीन वाजता अशोका मार्गावर छापा टाकून ६१.५ ग्रॅम एमडीसह तिघांना अटक करुन एमडी पुरविणाऱ्यालाही गजाआड केले आहे.
शुक्रवारी (दि.६) पहाटे तीन वाजता अशोका मार्ग परिसरात (Ashok Marg Area) २ लाख ९७ हजार पाचशे रुपयांचे एमडी बाळगणाऱ्यांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. अजय भिका रायकर (वय ३६), मोसिन हानिफ शेख (३६) व अल्ताफ पीरण शहा (३५, तिघे रा. म्हाडा बिल्डिंग, वडाळागाव) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध इंदिरानगर पोलिसांत एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या तिघांना एमडी पुरविणारा संशयित आकर्षण रमेश श्रीश्रीमाळ (३०, रा. भाग्यलक्ष्मी अपार्टमेंट, तलाठी कॉलनी, नाशिक) यालाही दुपारी ताब्यात घेतले. रायकर, शेख व शहा या तिघांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने ९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.
दरम्यान, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Commissioner Sandeep Karnik) यांनी अमली पदार्थविरुद्ध कारवाईत वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हे उपायुक्त प्रशांत बच्छाव व सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी ‘एनडीपीएस’ला सूचना केल्या होत्या. पथकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, सहायक निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील, सहायक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, देवकिसन गायकर, संजय ताजणे, अंमलदार बळवंत कोल्हे, अनिरुद्ध येवले, बाळासाहेब नांद्रे, योगेश सानप, चंद्रकांत बागडे, अविनाश फुलपगारे, अर्चना भड यांनी सापळा रचला. गुरुवारी (दि. ५) रात्रीपासून संशयितांवर पाळत ठेवण्यात आली. मुद्देमालासह संशयित दिसल्यावर त्यांना ताब्यात घेतले. संशयितांनी (Suspected) आळेफाट्यावरुन नाशिकमध्ये एमडी विक्रीसाठी आणल्याची माहिती पोलिसांना दिली.
शिक्षण सहावी, सातवी
संशयित अजय याचे सहावीपर्यंत शिक्षण (Education) झाले असून, अल्ताफ व मोसिन यांनी सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. तिघांचाही गंभीर गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले आहे. चौकशीदरम्यान एमडी तस्करीचे नवे ‘कनेक्शन’ उघड होणार आहे. नाशिक ‘एनडीपीएस’ ने ५ ऑक्टोबर २०२३ रोजी वडाळ्यात छापा टाकून ‘एमडी’ तस्कर वसीम रफीक शेख (वय ३६) व नसरीन ऊर्फ छोटी भाभी इम्तियाज शेख (वय ३२, रा. सादिकनगर, वडाळागाव) यांना अटक केली. छोटी भाभीचा पती इम्तियाज शेख, भिवंडीतून सलमान अहमद फलके, ठाण्यातून शब्बीर उर्फ आयना अब्दुल अजीज मेमन, कसाऱ्यातून सद्दाम सारंग यांना अटक झाली. यापैकी वसीम, छोटी भाभी व इम्तियाज कारागृहात आहेत. तर ऑक्टोबर २०२४ मध्ये इरफान उर्फ चिपड्या शेख (रा. सादिकनगर, वडाळा) व करण सोनटक्के (रा. नाशिकरोड) यांना अटक (Arrested) झाली होती.