इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri
घराच्या छतावर मुसळधार पावसाचे (Rain) साचलेले पाणी घरात गळत असल्याने त्याचा उपसा करतांना चुलत भावाच्या घराच्या पत्र्यावर पडले. यावरून कुरापत काढून लाकडी काठ्या घेऊन मोठे भांडण झाले. या घटनेत २५ वर्षीय दिनेश भटाटे या युवकाचा खून (Youth Murder) झाला आहे. या प्रकरणी प्रविण मच्छिंद्र भटाटे यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेत ६ जणांवर खुनाचा आणि अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) टिटोली येथील संशयित आरोपी ज्ञानेश्वर जगन्नाथ भटाटे याच्या घराच्या पत्र्यावर पाणी पडल्याने त्याने भांडण करून कुरापत काढली. प्रविण मच्छिंद्र भटाटे वय २९, रा. टिटोली याला आणि त्यांच्या कुटुंबीयांना वाईटसाईट शिवीगाळ केली. आरोपी राजेंद्र बाबुराव भटाटे, दिपक राजेद्र भटाटे, नितीन राजेंद्र भटाटे, महेश ज्ञानेश्वर भटाटे यांनी फिर्यादीचा भाऊ दामु उर्फ दिनेश मच्छिंद्र भटाटे याला घराशेजारील बोळीत ओढून नेवुन खाली पाडत मारहाण केली. या मारहाणीत आरोपी ज्ञानेश्वर भटाटे यांने त्याच्याजवळील असलेला चाकू (Knife) त्याचा मुलगा आरोपी रमेश ज्ञानेश्वर भटाटे याच्याकडे दिला.
यानंतर आरोपी रमेश भटाटे यांने फिर्यादीचा भाऊ दिनेश मच्छिंद्र भटाटे याच्या छातीच्या मधोमध चाकू भोसकून त्यास जीवे ठार मारले. फिर्यादी सुद्धा भांडणाचा प्रतिकार करीत असताना आरोपी नितीन राजेंद्र भटाटे यानें फिर्यादीचे डोक्यात लाकडी दांड्याने मारून दुखापत केली, अशी फिर्याद दिल्याने इगतपुरी पोलिसांनी संशयित आरोपी ज्ञानेश्वर जगन्नाथ भटाटे, रमेश ज्ञानेश्वर भटाटे, नितीन राजेंद्र भटाटे, दिपक राजेद्र भटाटे, राजेंद्र बाबुराव भटाटे, महेश ज्ञानेश्वर भटाटे सर्व रा. टिटोली, ता. इगतपुरी, जि. नाशिक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, घटनास्थळी पोलीस उपअधिक्षक हरीष खेडकर यांनी घटनास्थळी भेट दिली असून, या घटनेत एका आरोपीला पोलीसांनी (Police) अटक केली आहे. तर उर्वरीत आरोपी फरार असून, त्यांचा कसुन शोध घेतला जात आहे. आरोपींना त्वरीत अटक करावी या मागणीसाठी मयताच्या कुटुंबियासह टिटोली गावातील महिला व ग्रामस्थांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात (Igatpuri Police Station) गर्दी केली होती. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करीत असून या घटनेने इगतपुरी परिसरात खळबळ माजली आहे.