कळवण | वार्ताहर | Kalwan
कळवण तालुक्यातील (Kalwan Taluka) कन्हेरवाडी येथे प्रेमप्रकरणाच्या कारणातून एका २५ वर्षीय तरुणाचा निर्घुण खून (Murder) झाल्याची घटना घडली असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मयत तरुणाचे वडील मोतीराम एकनाथ चौर यांनी कळवण पोलिसात (Kalwan Police) दिलेल्या फिर्यादीनुसार नरुळ येथील सचिन मोतीराम चौर (२५) याचे मागील आठ वर्षांपासून आठवे येथील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. या संबंधांची माहिती दोन्ही कुटुंबियांना असल्याने दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने मुलीला दि. १४ रोजी तिच्या वडिलांनी तिला कन्हेरवाडी येथे सचिनच्या बहिणीच्या घरी पाठवून दिले होते.
दरम्यान दि. १५ रोजी मुलीचे चुलत भाऊ योगेश मोहन बागुल (२३), प्रकाश मोहन बागुल (२५) (रा. साकोरेपाडा) तसेच मुलीचा मेहुणा संदीप महादू पवार (३७) रा. चनकापूर यांनी या प्रेमप्रकरणाचा राग मनात धरून नियोजन करून कन्हेरवाडी येथे सकाळी सुमारे १० वाजेच्या सुमारास पोहोचत सचिनच्या छातीत तसेच डोक्यात तीक्ष्ण हत्याराने (Weapon) वार केला. या हल्ल्यात सचिनचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर घरातील नातेवाईकांनी आरडाओरड केल्याने गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तिन्ही संशयित आरोपींना पकडून कळवण पोलिसांच्या ताब्यात दिले.
दरम्यान, आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात (Kalwan Hospital) आणण्यात आले असता संतप्त नातेवाईकांनी आरोपींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली व आरोपींना सुरक्षितपणे पोलीस ठाण्यात हलवले. या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात भा. न्या. स. २०२३ अन्वये कलम १०३(१), ३५२, ३५१(२), ३५१ (३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर, पोलीस उपनिरीक्षक जगदीश बोरसे हे करत आहेत. या घटनेमुळे कन्हेरेवाडी तसेच नरुळ परिसरात शोककळा पसरली आहे.




