Monday, October 19, 2026
Homeक्राईमNashik Crime News : शिपाई भरतीत 'हायटेक' कॉपी; गुगलच्या मदतीने उत्तरे शोधणाऱ्या...

Nashik Crime News : शिपाई भरतीत ‘हायटेक’ कॉपी; गुगलच्या मदतीने उत्तरे शोधणाऱ्या उमेदवारावर गुन्हा

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मुंबई उच्च न्यायालयासह नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठातील हमाल, शिपाई व फराश या पदांच्या ९०० पेक्षा जास्त जागांसाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय परीक्षेत हायटेक कॉपीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील एका परीक्षा केंद्रावर थेट मोबाईलवरून गुगलच्या साहाय्याने प्रश्नपत्रिकेतील उत्तरे शोधताना एका उमेदवाराला पर्यवेक्षकांनी रंगेहात पकडले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) बीएनएस कलमांसह महाराष्ट्र गैरप्रकार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

कॉलेज रोडवरील (College Road) एस.एम.आर.के. कॉलेजमधील हॉल क्र. ११ मध्ये २६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी शिपाई पदाची परीक्षा सुरू होती. या हॉलमध्ये नाशिकराेडचे सह दिवाणी न्यायालयाचे (कनिष्ठ स्तर) सहायक अधीक्षक तुषार वडघुले आणि  प्राध्यापक सौरभ देशपांडे पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होते. परीक्षा सुरू असताना  परीक्षार्थी संशयित मनोज निवृत्ती वाघ (वय ३०) हा संशयास्पद हालचाली करताना दिसून आला.

पर्यवेक्षकांनी त्याची बारकाईने पाहणी केली असता, तो परीक्षा (Exam) कक्षात विनापरवानगी मोबाईल आणून गूगलच्या (Google) मदतीने प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे शोधत असल्याचे स्पष्ट झाले. कॉपीचा हा प्रकार निदर्शनास येताच पर्यवेक्षकांनी तत्काळ मोबाईल ताब्यात घेऊन संबंधित उमेदवाराला ताब्यात घेतले. त्यानंतर तुषार वडघुले यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात सरकारतर्फे तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून मनोज वाघ याच्याविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरद पाटील तपास करत आहेत.

टांगती तलवार

१६ हजार ते ५२ हजार रुपये वेतनश्रेणी असलेल्या या भरती प्रक्रियेसाठी हजारो उमेदवारांनी तयारी केली होती. मात्र, केवळ उत्तीर्ण होण्याच्या उद्देशाने ऑनलाइन कॉपीचा मार्ग अवलंबणाऱ्या या उमेदवाराला आता कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागत आहे. त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला असून, त्याच्या परीक्षेबाबत आणि पुढील पात्रतेबाबतचा अंतिम कायदेशीर निर्णय जिल्हा न्यायालय घेणार आहे. परीक्षा केंद्रात तपासणी असतानाही उमेदवार मोबाईल फोन आत घेऊन कसा गेला, यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

ताज्या बातम्या

हार्वेस्टरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू

0
पुनदखोरे | वार्ताहर कळवण तालुक्यातील हुंड्यामोख (गणोरे ) शिवारात सोयाबीन काढणी सुरू असताना हार्वेस्टर यंत्रात अडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ओम...