नाशिक | प्रतिनिधी | Nashik
लग्नाचे (Marriage) कायदेशीर आमिष दाखवण्यासाठी चक्क लिव्ह-इन-रिलेशनशिपचा करारनामा (ॲग्रीमेंट) तयार करायचा, आणि त्याच कागदाच्या आधारे महिलेला विश्वासात घेऊन तिच्यावर अत्याचार (Rape) करायचे… असा एक संतापजनक प्रकार नाशिकरोड परिसरात उघडकीस आला आहे. शारीरिक शोषणच नव्हे, तर पोटातील बाळ मारण्याच्या उद्देशाने गर्भवती महिलेच्या पोटावर लाथा मारून पुरावे नष्ट करण्यासाठी मोबाईल (Mobile) फोडण्यापर्यंत संशयिताची मजल गेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मुख्य संशयितासह पाच जणांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, धनंजय उर्फ सोनु जयद्रथ काकडे (वय ३३, रा. रोकडोबावाडी, काकडे गल्ली, उपनगर) असे मुख्य संशयिताचे नाव आहे. फिर्यादीनुसार, ऑक्टोबर २०२४ ते ऑगस्ट २०२६ या दोन वर्षांच्या कालावधीत नाशिकरोड येथील हॉटेल ग्रेट मराठा, मीना बाजार परिसर आणि दत्त मंदिर सिग्नलजवळील हिमालय सोसायटीमधील फ्लॅटमध्ये पीडितेवर अत्याचार करण्यात आले. संशयिताने पीडितेचा विश्वास संपादन करण्यासाठी तिच्यासोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपचा करारनामा केला. या कराराचा धाक आणि लग्नाचे आमिष दाखवत त्याने पीडितेशी शारीरिक संबंध ठेवले.
संबंधातून पीडित महिला वारंवार गर्भवती (Pregnant) राहिली. मात्र, संशयित धनंजय याने तिला बाळ जन्माला घालू न देता तीन वेळा तिचा गर्भपात घडवून आणला. या मानसिक व शारीरिक त्रासातून सावरत असतानाच पीडिता पुन्हा गर्भवती राहिली. २३ सप्टेंबर २०२६ रोजी घडलेल्या घटनेने क्रूरतेचा कळस गाठला. संशयिताने पीडितेला चारचाकी गाडीत बसवून नांदूर नाका मार्गाने विंचूरच्या मागे असलेल्या एका लॉन्सजवळ नेले. तेथे तिला गाडीतून खाली खेचून, पोटातील बाळ मृत पावण्याच्या थेट उद्देशाने तिच्या पोटावर लाथा मारून मारहाण केली.
मोबाईल फोडला
अत्याचार आणि मारहाणीनंतर आपल्याविरोधात कोणताही पुरावा राहू नये, यासाठी संशयित धनंजय काकडे व त्याच्या चार साथीदारांनी पीडितेचा मोबाईल फोन जबरदस्तीने फोडून नष्ट केला. घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, नाशिकरोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक आहेर तपास करत आहेत.




