नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरातील बहुचर्चित म्हाडा घोटाळ्यात (Mhada Scam) आधीच ४० हून अधिक बिल्डर्स आणि विकसकांवर कारवाईची टांगती तलवार कायम असताना, आता एका नव्या जमीन फसवणूक प्रकरणामुळे नाशिकच्या बांधकाम व्यवसायात खळबळ उडाली आहे. एनए प्लॉट बनवून देण्याचे आणि विक्रीचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी शहरातील नामवंत बिल्डर्स आणि विकसकांविरुद्ध सरकारवाडा पोलिस ठाण्यात (Sarkarwada Police Station) फसवणुकीसह एमपीआयडी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण कायद्यान्वये नवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अॅड. हेमंत सुरेश सातभाई (५३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिसांनी मंगळव- ारी (दि. २) रात्री गुन्ह्याची (Crime) नोंद केली आहे. त्यानुसार, संशयित जितेंद्र मनोहरदास ठक्कर, काश्मिरा राजेंद्र शहा, अनघा यशवंत गुजर, बाबूलाल मणिलाल शहा, राजेश बाबूलाल शहा, रोहित मणिलाल शहा, सुरेंद्र मणिलाल शहा, अश्विन गोवर्धनदास जसपरा, राजेंद्र रसिकलाल शहा आणि संस्थेचे पदाधिकारी शरद कुटे व भास्कर आनंदराव पवार अशा एकूण ११ जणांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलमे आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण) अधिनियम अन्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल केला आहे. हे संपूर्ण प्रकरण मखमलाबाद शिवारातील जुन्या सर्व्हे नंबर ३८८+३८९ मधील वकीलनगर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीच्या नियोजित अभिन्यासाशी (ले-आउट) संबंधित आहे.
सातभाई यांनी सन १९९८ मध्ये या सोसायटीचे सभासदत्व घेतले होते. संशयित बिल्डर्सच्या शुभशनी कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीने एन. प्लॉट विकसित करून देण्याचे आमिष दाखवले होते. यानंतर सातभाई यांनी प्लॉट नंबर १२५ (क्षेत्रफळ ३६० चौरस वार) साठी संपूर्ण रक्कम भरली आणि त्यांना लेटर ऑफ अलॉटमेंटदेखील देण्यात आले. परंतु, संशयितांनी (Suspected) कायदेशीर खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ केली. गंभीर बाब म्हणजे, आर्थिक फायद्यासाठी संशयित बिल्डर्स आणि संस्था पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून कट रचला आणि २४ डिसेंबर २०२० रोजी बनावट खरेदीखताद्वारे हाच प्लॉट मदा-लसा पोपटराव देवरे नावाच्या व्यक्तीला परस्पर विकून टाकला. अशाचप्रकारे इतरही अनेक सभासदांची फसवणूक (Fraud) झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
वाचण्यासाठी न्यायालयात धाव
म्हाडा घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिस (Nashik Police) बिल्डर्स लॉबीवर पाळत ठेवून आहेत. या नव्या गुन्ह्याची तीव्रता आणि गांभीर्य लक्षात घेता, अटक टाळण्यासाठी या प्रकरणातील काही बड्या संशयितांनी घाईघाईने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतल्याचे समजते. तपास वरिष्ठ निरीक्षक सुरेश आव्हाड करत आहेत.




