Sunday, August 23, 2026
Homeक्राईमNashik Fraud Crime : अदानी ग्रीन सोलर प्लांटचे आमिष दाखवून १ कोटींची...

Nashik Fraud Crime : अदानी ग्रीन सोलर प्लांटचे आमिष दाखवून १ कोटींची फसवणूक; पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

शेतात ‘अदानी ग्रीन सोलर प्लांट’ बसवून दिल्यास दरवर्षी एका एकराला ५० हजार रुपये भाडे आणि तब्बल ३० लाख रुपयांचे अनुदान मिळवून देण्याचे मोठे आमिष दाखवून शेतकऱ्यांची (Farmer) तब्बल १ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात ठकबाजीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

कोपरगाव (जि. अहिल्यानगर) येथील शेतकरी दिगंबर सिताराम गाडे (वय ५७) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. दिलेल्या तक्रारीनुसार, जुलै २०२६ ते २२ ऑगस्ट २०२६ दरम्यान पंचवटीतील (Panchvati) दिंडोरी नाका परिसर, अभिषेक स्वीटसमोरील भागचंद कॉम्प्लेक्समधील ‘राजेश महेश ॲड कंपनी’च्या कार्यालयात हा सगळा प्रकार घडला.

संशयित आरोपी विजय दोंदे हा स्वतःला अदानी ग्रीन एनर्जीचा प्रतिनिधी असल्याचे सांगायचा आणि त्याचा साथीदार अभिषेक हा मॅनेजर असल्याचे भासवायचा. दोघांनी दिगंबर गाडे व त्यांच्या मित्रांचा (Friends) विश्वास संपादन केला. शेतात सोलर प्लांट बसवल्यास मोठा आर्थिक फायदा होईल, असे सांगून त्यांनी गाडे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून वेळोवेळी तब्बल १ कोटी रुपयांची रोख रक्कम उकळली.

ऑफिसला ठोकले कुलूप

रक्कम उकळल्यानंतर संशयितांनी कोणतीही पावती दिली नाही आणि शेतात प्लांटचे कामही सुरू केले नाही. शेतकऱ्यांनी संशयित विजय दोंदे याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा फोन बंद येत होता. संशय आल्याने शेतकऱ्यांनी नाशिक येथील दिंडोरी नाका येथील कार्यालयात धाव घेतली, मात्र तेथे ऑफिसला कुलूप ठोकलेले आढळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गाडे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी फसवणूक, विश्वासघात आदी प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. घटनास्थळी पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी भेट देत पाहणी केली . सहायक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक सायन्स टीम आणि ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन पुरावे गोळा केले आहेत.

ताज्या बातम्या